स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर आमच्या माथी का फोडता! ‘तुमच्या’ तालुक्यात आमचे ‘आमदार’ मुलांना कामाला लावत असतील तर नाकर्तेपणा कुणाचा… भाजप अध्यक्ष माऊली ताकवणे यांची संतप्त प्रतिक्रिया

आमच्या आमदारांचे कार्य मोठे, पण तुमच्या साहेबांना स्वतःच का करता छोटे!
आमदार राहुल कूल यांची बदनामी करणाऱ्यांना दौंडकरांचे सडेतोड उत्तर

सहकारनामा

दौंड : आमदार राहुल कूल यांचे निकटवर्तीय इंदापूरचा टोलनाका चालवतात, या टोलनाक्यात त्यांच्या सांगण्यावरून मुलांना काम मिळते, नोकऱ्या लागतात. येथे मुले कामाला लावण्यासाठी आमदार साहेबांचे मोठे प्रयत्न होत असतात त्यामुळे दौंडकरांचा लाड इंदापूरमध्ये का असा आरोप इंदापूरच्या एका गटनेत्यांनी केल्याने आता याबाबत दौंडमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दौंड भाजपचे अध्यक्ष माऊली ताकवणे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, एका गट नेत्यांनी दौंड चे आमदार राहुल कूल आणि दौंडकरांबाबत जे वक्तव्य केले ते खूपच चुकीचे असून दौंड हे बिहार मध्ये नाही तर पुणे जिल्ह्यात आहे. दौंडची मुले आपल्या रोजगारासाठी इंदापूर टोल नाक्यावर जर काम करत असतील तर त्यात कुणाच्या पोटात दुखायचे कारण काय असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे आणि आमच्या आमदारांचे कार्य मोठे, पण तुमच्या …साहेबांना स्वतःच का करता छोटे असा खोचक टोलाही लगावताना जर आमचे आमदार तुमच्या तालुक्यात आमची मुले कामाला लावत असतील तर मग तुमचे प्रतिनिधी काय करत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
माऊली ताकवणे यांनी पुढे बोलताना, आमदार राहुल कूल हे संपूर्ण राज्यात आरोग्यदूत आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे कोणत्याही तालुक्यातील माणूस, पेशंट जर आपली अडचण घेऊन आला तर ते ती अडचण माणुसकीच्या नात्याने दूर करतात. ते कधीच असा विचार करत नाहीत की हा माणूस माझ्या तालुक्यातील नाही किंवा हा माझ्या मतदार संघाचा नाही… ते फक्त त्याची अडचण काय आहे आणि त्यातून त्याला मदत कशी करता येईल हेच पाहत असतात त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा निकाल वेगळा लागत असताना सुद्धा तालुक्याचा निकाल वेगळा लागला ही त्यांच्या कामाची पावती होती.
आमदार राहुल कूल हे दौंडमधील मुलांना नोकरी आणि व्यवसायासाठी इंदापूरच काय राज्यात कोठेही प्रयत्न करत असतात आणि करत राहतील यात गैर काय आहे. मात्र केवळ एखाद्या टोलवरील ठेक्याच्या मोहापाई काहीजण आरोग्यदूत आमदारांच्या बदनामीचा प्रयत्न करून त्यांचे नाव तेथे जोडून आपले कसे साधले जाईल हे पाहत त्यांची बदनामी करत असतील तर हे खूपच दुर्दैवी म्हणावे लागेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

आणि तुमच्या तालुक्याला मंत्रीपद आहे आणि दौंड तालुक्याचे आमदार जर इंदापूरमध्ये काम करत आहेत असे तुम्ही म्हणता म्हणजे मग तुम्ही तुमच्या तालुक्याला मिळालेल्या मंत्री पदाचा अपमान करत आहात इतकी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येऊ नये! इंदापूर तालुक्याला राज्याचे मंत्रिपद असताना जर हे गटनेते म्हणत असतील की येथे आमदार राहुल कूल यांचे ऐकले जाते तर मग यावरून आमदार कूल यांची कार्यव्याप्ती लक्षात येते असे शेवटी माऊली ताकवणे यांनी ‘सहकारनामा’ शी बोलताना सांगितले.

तर तुम्ही टोल प्रशासनाला त्याबाबत विचारा, आमदारांवरील बिनबुडाचे आरोप सहन केले जाणार नाही… जर तुमची मुले तेथे कामाला लागत नसतील तर त्यात दौंडच्या आमदार साहेबांचा काय दोष? याबाबत त्या संबंधित कंपनीला विचारा ते योग्य उत्तर देतील पण उगच कुणाचे तरी नाव घेऊन त्यांच्यासोबत आमदार साहेबांचे नाव जोडायचे आणि आमदार साहेबांना बदनाम करायचा प्रयत्न करायचा हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी माऊली ताकवणे यांनी दिला आहे.