दौंड : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या विशेष प्रयत्नांनी दौंड तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला आहे. त्या लाभार्थ्यांचा आज गुरवार दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी लाभार्थी स्वप्नपूर्ती सोहळा पिंपळगाव ता.दौंड येथे पार पडला. या सोहळ्यासाठी लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. एक हजार घरांची बांधणी सुरु आहे. ६०० घरांना पहिला, दुसरा आणि तिसरा हफ्ता मिळाला आहे. पुढील दीड हजार घरांचा डीपीआर शासन स्तरावर प्रलंबित असून तेही कामे लवकरच सुरु होतील अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आणि निवडणुकीपुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे. कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
आमदार कुल यांनी आपल्या भाषणात बोलताना, या अगोदर २०१८-१९ ला काहीजणांकडून सांगितलं जात होतं की ही योजना फसवी आहे, निवडणुकी पुरतं भांडवल केलं जात आहे. मात्र तरीही आपण लोकांनी आमच्या बोलण्यावर विश्वास टाकला त्यामुळे प्राधानमंत्री आवास योजनेचे सर्वात जास्त लाभार्थी हे दौंड तालुक्यातील पहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुल यांनी पुढे बोलताना, विविध योजनांद्वारे आर्थिक दुर्बल घटकांना आपण लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जे बांधकाम कर्मचारी, मजूर आहेत त्यांना या अडीच लाख रुपयांच्या बांधकाम व्यतिरिक्त आणखीन २ लाख रुपये मिळतील त्यामुळे या लोकांना एकूण साडेचार लाख रुपये मिळावेत असा आम्ही प्रयत्न करत असून अडीच लाख रुपये लाभ मिळालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांना अजून दोनलाख रुपये मिळतील अशी ग्वाही आ.राहुल कुल यांनी यावेळी देत तालुक्यातील विविध रस्ते, उड्डाण पूल, रेल्वे उड्डाण पूल, पाणी, वीज यांच्या कामांची आणि प्रगतीपथाची यादी यावेळी वाचून दाखवली.
कारखाना व इतर संस्था चांगल्या पद्धतीने सुरु.. भीमा पाटस कारखाण्याबाबत बोलताना त्यांनी, कारखाना सहकारी आहे आणि ज्यांना शंका आहे त्यांनी जनरल मिटींगला यावं त्यांची शंका दूर होईल. कारण कारखान्याची जनरल मिटिंग होते आणि तेथे सर्व सभासदांना बोलण्याचा अधिकार दिला जातो यावरून कारखाना सहकारी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण अडचणीत असताना त्या लोकांना सोबत घेऊन कामकाज सुरु केलं आणि कारखान्याकडून यावेळी ३ हजारांचा दर मिळाला आहे पुढे ही आणखी दर मिळत राहील असे सांगितले.
टिका करणाऱ्यांना योग्यवेळी उत्तरं देऊ – दूध संघाची चांगली व्यवस्था केल्याने तोही आता चांगल्या अवस्थेत सुरु आहे. विधानसभा, कारखाना आणि आत्ता ताब्यात आलेली मार्केट कमिटी या सर्वांमध्ये चांगलं नियोजन करून पुढे जाण्याचा आमचा मानस राहिलेला आहे असे कुल यांनी म्हणत टिका करणारे, विरोध करणारे स्वतःचे नाव न सांगता टिका करत आहेत. मात्र टिका करणाऱ्यांना टिका करू द्या, योग्यवेळी सर्व टिकेची उत्तरे दिली जातील. कुणी कितीही टिका केली तरी सर्व टिकेची उत्तरे एकाचवेळी दिली जातील असे आमदार राहुल कुल यांनी आपल्या भाषणात सांगितले.
तालुक्यातील माफिया राज संपुष्टात, हिम्मत असेल तर समोरून वार करा – तालुक्यात वाळू माफिया कुणी आणले, गुंड कोण आणत होते आणि गुंडगिरी दादागिरी कोण करत होतं हे सर्वांना माहित आहे. नागरिकांना आणि जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी गेल्या दहावर्षांमध्ये अश्या गुंडगिरीचा आम्ही बिमोड करण्यात यशस्वी झालो आहोत. काहीजण आपण काय केलंय हे त्यांना सांगता येत नाही आणि मी जे करतोय त्यावर बोलता येत नाही त्यामुळे ज्यावेळी समोरून वार करणं शक्य नसतं त्यावेळी काही लोक पाठीवर वार करण्याचा प्रयत्न करतात. तश्याच प्रकारचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्याने समोर येऊन प्रश्न विचारावा त्याचं उत्तर देऊ परंतु प्रश्न विचारणाऱ्यांची नावं टाकण्याचं धाडस ज्याच्यामध्ये नाही त्याचं उत्तर कुणाला द्यायचं असा माझा प्रश्न आहे असेही कुल म्हणाले.
विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात – काहीवेळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे त्याचा फटका बसतो. लोकसभेला असेच झाले. संविधान बदलले जाणार असा संभ्रम निर्माण करण्यात आला आणि त्यावर लोकांना विश्वास बसला पण मी हे खात्रीने सांगतो की संविधान कधी बदलले जाणार नव्हते आणि यापुढेही ते बदलले जाणार नाही.