मुळशी धरण, जनाई शिरसाई आणि पाण्याच्या विविध स्रोतांबाबत आ.राहुल कुल यांनी विधानसभेत ‘लक्षवेधले’

मुंबई : मुळशी धरणाचे पाणी वळविण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा व जनाई शिरसाई उपसा सिंचन चालू करण्यासाठी फेर सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून नव्याने समाविष्ट तलावांना पाणी देण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली. मुळशी धरणाचे पाणी पुण्याला देण्याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी वेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले कि, टाटा पॉवर कंपनीने पुणे जिल्ह्यात मावळ व मुळशी तालुक्यात एकूण सहा धरणे बांधली असून, या धरणातील पाणीसाठा पश्चिमेकडे वळवून त्याद्वारे विद्युत निर्मिती करण्यात येत आहे. मुळशी धरणाचे पाणी टप्प्या टप्प्याने कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून मुळशी इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर केला आहे या ठिकाणी अनेक बंधने नागरिकांवर घातलेली आहेत. मुळशी धरणाचे पूर्वमुखी असलेले सुमारे ४५ टीएमसी पाणी हे अनैसर्गिकरित्या पश्चिमेकडे वळविण्यात आले आहे. सद्यस्थितीत पाण्याचा प्राधान्यक्रम पाहता, हे पाणी पूर्वेकडे पुन्हा वळविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार पाणी अनैसर्गिकरित्या पश्चिमेकडे वळविण्यात आल्यामुळे निसर्गाचा असमतोल निर्माण झाला आहे. तो पूर्वपदावर आणण्यासाठी शासन काय कार्यवाही करणार, पुणे महानगर पालिकेने जादाचे वापरलेले पाणी शुद्ध करून ग्रामीण भागाला पुन्हा देण्याबाबत काय कार्यवाही करणार, धरणाचे नियंत्रण पुन्हा जलसंपदा विभागाला देऊन पाण्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी शासन काय कार्यवाही करणार, व शासनाचे काही मापदंड शिथिल करून जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतील नवीन तलाव व जुने समाविष्ट तलाव भरण्याबाबत सर्वेक्षण करून शासनाने कारवाई करावी अशी मागणी आमदार कुल यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले कि, पश्चिमेकडे वळविण्यात आलेल्या पाण्याचा वापर करण्याची मार्यदा निश्चित करण्यात आलेली आहे. दुसरा कृष्णा पाणी तंटा लवाद स्थापन करण्यात आला असून, अजून त्याची कार्यवाही सुरु झालेली नाही त्यामुळे त्याआगोदर पाण्याच्या बाबतीत काही निर्णय घेणे उचित ठरणार नाही असे समिती सदस्य नारगोळकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे दुसरा कृष्णा पाणी तंटा लवाद यांचा निर्णय आला कि, कार्यवाही करण्यात येईल. पुणे महानगर पालिकेला पाणी पुनर्वापर करण्याबाबत आग्रह शासनाने धरलेला असून त्याबाबत पत्रव्यवहार पण करण्यात आलेला आहे. त्यासाठी जायकाकडून मोठा निधी मिळाला असून त्यामाध्यमातून सुमारे १५०० एम. एल. डी. पाणी शुद्धीकरण होणार आहे. तातडीने हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत देखील पाठपुरवा सुरु आहे. जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला सुध्दा प्रकल्पीय क्षमतेने पाणी उपलब्ध करून देणे शक्य होत नाही.

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या मूळ मंजूर प्रकल्पीय अहवालामध्ये एकूण ६५ तलावांचा समावेश असून त्यापैकी ४५ तलावांना सद्यस्थितीत पाणी सोडण्यात येते. उर्वरीत २० तलावांना तांत्रिक बाबींमुळे पाणी देता येत नाही. मंजूर प्रकल्प अहवालामध्ये समावेश नाही अशा तलावांबाबत काय उपाययोजना करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षणाबाबत कार्यवाही क्षेत्रीय / महामंडळ स्तरावर हाती घेण्यात आली आहे. सदर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यातील निष्कर्षानुसार पुढील कार्यवाही करणे शक्य आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.