विधानसभेत आमदार ‛राहुल कुल’ आक्रमक..
MPSC विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या ‛वीज बिल’, कर्जमाफी मुद्द्यांवर प्रश्नांची सरबत्ती

मुंबई : राज्यामध्ये आणि खासकरून दौंडमधील mpsc विध्यार्थ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे वीज बिलाचे प्रश्न, शेतकरी कर्जमाफी या प्रश्नांवर दौंडचे आमदार राहुल कुल हे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्रात नुकतेच हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनामध्ये राज्यसरकार आणि विरोधीपक्ष यांच्यामध्ये विविध प्रश्नांवरून खडाजंगी होताना पाहायला मिळत असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा गोंधळ, म्हाडा व आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचे प्रकरण, भरतीतील गैरव्यवहार यामुळे शासकीय भरतीसाठी तयारी करणारे राज्यातील लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत करत यापूर्वी दौंड तालुक्यातील स्व. स्वप्नील लोणकर व स्व. मल्हारी नामदेव बारवकर हे विद्यार्थी शासकीय दुराव्यास्था व संबंधित यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराचा बळी ठरले आहेत या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी यावेळी आक्रमकपणे शासनाचे लक्ष वेधले.

पुढे बोलताना त्यांनी कोरोना महामारीचे संकट, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला राज्य शासनाने वीज बिलामध्ये सवलत द्यावी अशी मागणी केली व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, विविध सवलतींच्या आश्वासनांची पूर्तता व्हावी तसेच थकीत वीजबिलापोटी खंडित केलेले शेती पंपाचे वीज जोड पूर्ववत करावेत या महत्वाच्या बाबीवर त्यांनी अध्यक्ष महोदयांचे सभागृहामध्ये लक्ष वेधले.