आमदार गोपीचंद पडळकर यांचा दौंड ख्रिश्चन समाजाकडून निषेध, तहसीलदारांना निवेदन

दौंड (अख्तर काझी) : आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू यांच्या विषयी अतिशय बेताल वक्तव्य करत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तसेच धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप ख्रिश्चन समाजाकडून करण्यात आला असून पडळकर यांच्या या कृत्याचा समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने दौंड मध्ये निषेध नोंदविण्यात आला आहे. त्यांची आमदारकीच रद्द करावी अन्यथा ख्रिश्चन समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ख्रिश्चन बांधवांनी दिला आहे.

दौंड पास्टर वेल्फेअर असोसिएशन व ख्रिश्चन बांधवांनी आज दि. 26 जून रोजी दौंड तहसीलदार यांची भेट घेत याबाबतचे निवेदन दिले आहे. यावेळी पास्टर वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष विनोद जाधव, दौंड मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉक्टर फिलोमन पवार, दौंड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष फिलीप अँथोनी तसेच ख्रिश्चन समाज बांधव उपस्थित होते.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा मतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू यांच्या विषयी बेताल वक्तव्य करीत, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली. स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करताना त्यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात चितावणीखोर भाषण करून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले. या कृत्याचा समस्त ख्रिश्चन समाज निषेध नोंदवित आहे.

धर्मगुरूंना ठार मारणाऱ्याला, त्याचा सैराट गेम करणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी सभेत जाहीर केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे धर्मगुरूंची समाजविघातक व्यक्तीकडून हत्या होऊ शकते. त्यामुळे धर्मगुरूंच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास गोपीचंद पडळकर जबाबदार असतील. जनतेतून निवडून आलेला आमदारच अशी बेताल भाषणे करून ख्रिश्चन समाजाबद्दल गरळ ओकत असेल तर त्याला आमदारपदी राहण्याचा अजिबात अधिकार नाही.

बेताल व वक्तव्य करणाऱ्या आमदाराचे राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्वरित निलंबन करावे, त्यांची आमदारकी रद्द करावी अन्यथा ख्रिश्चन समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलने चालूच राहतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.