पुणे : यवत पोलिस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या केडगाव पोलीस चौकी येथे अगोदर कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे हे अखेर घरी परतले आहेत. याबाबतची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी माध्यमांना दिली आहे. मागील पाच दिवसांपूर्वी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची पोस्ट केली होती यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजली होती. ते व्हाट्सअप स्टेटस ठेवून ते बेपत्ता झाल्याने सर्वांनाच काळजी लागली होती.
आत्महत्या करत असल्याची पोस्ट रणदिवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. रणदिवे यांच्या या पोस्ट नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर यवत पोलीस ठाणे, शिक्रापूर पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त टीम रणदिवे यांचा युद्ध पातळीवर शोध घेत होती.
पोस्ट टाकून बेपत्ता झालेले निखिल रणदिवे अखेर काल मध्यरात्री सुखरूप घरी परतल्याची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी दिली आहे.






