अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील व्यापाऱ्याने आपल्याच दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाच आता म्हशीच्या गोठ्यामध्ये काम करत असलेल्या परप्रांतीय कामगाराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना दौंड मधील पानसरे वस्ती परिसरात घडली आहे. शहर व तालुक्यात बलात्कार, विनयभंग सारख्या संतापजनक घटना घडत असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण असून सामान्य नागरिकांकडून चीड व्यक्त करण्यात येत आहे.
दौंड पोलिसांनी आरोपी रोशन कुमार उर्फ राजा (पूर्ण नाव माहित नाही, रा. पानसरे वस्ती म्हशीचा गोठा, दौंड) विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8,12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना दिनांक 21 जुलै रोजी दुपारी 3.30 च्या दरम्यान शहरातील पानसरे वस्ती परिसरातील म्हशीच्या गोठ्यात घडली.
पीडित मुलगी आपल्या बहिणी सोबत म्हशीच्या गोठ्यात काम करीत असताना आरोपी तेथे आला व त्याने पीडित बहिणीच्या अंगावर चाल केली. हे पाहून पीडित मुलीने आरडाओरडा केला त्यामुळे आरोपीने आपला मोर्चा तिच्याकडे वळविला व त्याने पीडित मुलीला आपल्याजवळ ओढले व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला.
घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करीत आहेत.