हवेली : मणेरवाडी ता. हवेली येथे एका १४ वर्षीय शाळकरी मुलाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत मयत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 18 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच किंवा त्या अगोदर फिर्यादी अनिता हरिसिंग राजपूत यांचे राहते घरी त्यांचा लहान मुलगा प्रकाश हरिसिंग राजपुत, (वय – १४ वर्षे, शिक्षण) यांस कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार हत्याराने त्याच्या डोक्याच्या मागील बाजुस, मानेवर मागील बाजुस व पाठीवर वार करून ठार मारले आहे.
शाळकरी लहान मुलाचा इतका भयानक खून करण्यात आल्याने मणेरवाडी परिसरात खळबळ माजली आहे. या मुलाचा खून कोणी आणि का केला हे अद्याप समजू शकले नाही. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वांगडे करीत आहेत.