दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)
मुथूट फायनान्स कंपनीने आपल्या जाहिरातीमध्ये मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र कुराणा मधील काही महत्त्वाचा मजकूर (आशय) एका सिने अभिनेत्याबरोबर छापून मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखाविल्या आहेत. मुथूट कंपनीच्या या दुष्कृत्याचा दौंड MIM पक्ष व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात येऊन याबाबतचे निवेदन दौंड पोलिसांना देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील गाजियाबाद शहरातील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयामधील जाहिरातीमध्ये पवित्र कुराणामधील महत्त्वाचा आशय छापलेला आहे. या कुराणातील आशयाच्या शेजारीच एका सिने अभिनेत्याचे बूट घातलेले छायाचित्र छापण्यात आलेले आहे. मुस्लिम धर्माच्या नियमानुसार कुराणातील आशयाचा वापर कोणत्याही व्यक्तींबरोबर दर्शविण्यासाठी धार्मिक बंधन आहे.
त्यामुळे मुथूटच्या या वादग्रस्त जाहिरातीमुळे मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखाविल्या आहेत. सदर प्रकार गंभीर असून मुथूट फायनान्स कंपनी व या जाहिरातीतील सुपरस्टार सिने अभिनेते यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी पक्षाचे शहराध्यक्ष मतीन शेख, हमीद शेख, शाहिद पानसरे, शाहिद शेख, इमरान पटेल, बबलू शेख आदी उपस्थित होते.