ऑडी ‛कार’ आणि ‛दुचाकी’च्या अपघातात तरुणाचा ‛मृत्यू’, संतप्त गावकऱ्यांनी ऑडी कार ‛जाळली’

दौंड : दौंड तालुक्यात सध्या रस्ते खूप चांगले झाले आहेत मात्र या रस्त्यांवरून वाहन चालक वाहतुकीचे नियम डावलून बेभान वाहने चालवत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

आज असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील पाटसजवळ असणाऱ्या बिरोबावडी जवळ घडला असून भरधाव कार आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला आहे. यानंतर संतप्त जमावाने ऑडी कार पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

नेहाल अप्पासाहेब गावडे (वय २६) असे या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून या अपघातामध्ये ऑडी चालकही किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नेहाल गावडे हा युवक बिरोबावाडी येथील बिरोबाच्या मंदिरात दर्शनासाठी आला होता. दर्शन घेऊन तो दुचाकीवरुन घरी परतत असताना पाटस-दौंड मार्गावर त्याची दुचाकी आणि ऑडी कारमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत नेहाल गावडे याच्या डोक्याला गंभीर मार लागला त्यामुळे त्याचा रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाला.

हा सर्व प्रकार पाहून तेथील स्थानिकांना राग अनावर झाला आणि त्यांनी थेट ऑडी कारच पेटवून दिली. पाटस-दौंड येथील अष्टविनायक मार्गावर अचानक ही घटना घडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. या अपघातात कार चालकलाही मार लागला होता. यवत, पाटस पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातात जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.