दौंड : केंद्र सरकारच्या वनमंत्रालयाने झारखंड येथील सिद्धक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी या प्राचीन जैनक्षेत्रास पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा समस्त जैन बांधवांनी निषेध नोंदविला आहे. वन मंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात जैन बांधवांच्या वतीने दि. 21 डिसेंबर रोजी भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी येथील सकल जैन समाजाचे प्रमुख प्रेमसुख कटारिया, शांतीलाल मुनोत, सुशील शहा, घिसुलाल जैन, स्वप्नील शहा यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. निषेधाचे निवेदन तहसील कार्यालयाला देण्यात येणार आहे. जैन बांधवांनी या मूक मोर्चा मध्ये सहभागी होऊन निवेदन देईपर्यंत आपली दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
जर तीर्थक्षेत्र सुटले तर धर्मही सुटेल आणि धर्मच राहिला नाही तर जैन म्हणून घेण्यासाठी अर्थच उरणार नाही. या तीर्थक्षेत्रास पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राहणार नाही अशी जैन बांधवांची धारणा आहे, म्हणून केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध म्हणून मूक मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.