दौंड : बदलापूर शहरातील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत घृणास्पद व संतापजनक घटना घडली. संपूर्ण देशाला शरमेने मान झुकवावी लागलेल्या या घटनेविरोधात दौंडकरांनी रस्त्यावर उतरत निषेध नोंदविला आहे.
बदलापूर घटनेतील नराधमास न्यायालयात त्वरीत शिक्षा होऊन भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी प्रत्येक जण यावेळी करीत होता. घटनेचा निषेध करण्यासाठी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येथील सर्व राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करीत मोर्चाची सांगता दौंड पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. यावेळी दोन चिमुकल्या मुलींच्या हस्ते पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मा. नगराध्यक्ष बादशाह शेख, रोहित पाटील, रुपेश कटारिया, अमोल जगताप, अविनाश गाठे, रतन जाधव, जावेद सय्यद, उमेश कांचन, अक्षय वाघमारे, ऍड. फिरोज शेख, जयंत पवार आदी उपस्थित होते.
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सुद्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला. शाळेतील चिमुकल्या मुलींवर जो अमानुष प्रकार घडला त्या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार नोंदविण्यासाठी 12 तासापेक्षा जास्त वेळ घालविला पोलिसांच्या या भूमिकेचाही यावेळी निषेध करण्यात आला. आंदोलनात सहभागी महिलांनी, तुमचे पंधराशे नको आम्हाला सुरक्षा हवी अशा घोषणा देत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
पक्षाचे जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी व उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात महिला आघाडी जिल्हा संघटक ज्योती गाडे, शहर प्रमुख आनंद पळसे, संतोष जगताप, विद्या घायाळ, रोहिणी वाळके, शंकर शितोळे, किरण वाळुंजकर, अमोल भागवत, गणेश दळवी तसेच शिवसैनिक सहभागी होते.