अख्तर काझी
दौंड : दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (एस. आर. पी. गट, क्र. 5) मधील सरस्वती बालक मंदिर शाळा (बालवाडी) बंद करून येथे इंग्रजी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य राखीव पोलीस (गट 5) व महासंचालक (राज्य राखीव पोलीस बल गट मुंबई) यांनी घेतलेला आहे व त्यांनी सदरच्या शाळेला टाळे ठोकले आहे. एस.आर.पी ने घेतलेला सदरचा निर्णय अत्यंत संताप जनक असून या मराठी शाळेत शिक्षण घेणाऱ्या 85 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाणार आहे.
त्यामुळे राज्य राखीव पोलीस दलाने जर हा निर्णय बदलला नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष सचिन कुलथे यांनी दिला आहे. पक्षाच्यावतीने सदरची मराठी शाळा चालू ठेवणे बाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी सचिन कुलथे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा डेंगळे, सुरेखा बगाडे उपस्थित होते.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, येथील एस. आर. पी. गट क्र. 5 येथील सरस्वती बालक मंदिर ही मराठी शाळा सन 2008 पासून सुरू करण्यात आली असून आजपर्यंत ही शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या सुद्धा वाढत आहे. आज मीतिला 85 विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. सदरची शाळा उत्तम पद्धतीने चालू असताना त्या जागी फर्स्ट स्टेप्स इंग्रजी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य राखीव पोलीस बल गट क्र.5 व राज्य राखीव पोलीस बलगट मुंबई चे पो. महासंचालक यांनी घेतलेला आहे.
या शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग व पालक यांना या निर्णयाची कोणतीही पूर्वसूचना न देता सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुरू असलेली मराठी शाळा बंद केली गेली तर चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तरी सदरची मराठी शाळा बंद करू नये अशी मागणी मनसे( दौंड शहर व तालुका), विद्यार्थी व पालक वर्ग यांच्या वतीने करण्यात आली आहे. तरीसुद्धा शाळा बंद केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा डेंगळे म्हणाल्या की, राज्य राखीव पोलीस दलाने शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. आम्हाला याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. काल दि.1 फेब्रुवारी रोजी शाळा बंद करण्याबाबतची नोटीस मला देण्यात येत होती परंतु ती मी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी आज दि. 2 फेब्रुवारी रोजी शाळेला टाळे ठोकून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. आज आम्ही शाळेच्या व्हरंड्यामध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले असे भावनिक होत डेंगळे यांनी सांगितले.