फडणवीस यांनी दरेकरांमार्फत मराठा समाजात फूट पाडण्याचं षडयंत्र रचलंय, सध्या आमचं कुठही आंदोलन सुरु नाही, हे त्या ‘तिघांचं’ षडयंत्र – जरांगे पाटील

जालना : फडणवीस यांनी दरेकरांमार्फत मराठा समाजात फूट पाडण्याचं षडयंत्र रचलंय. सध्या राज्यात आमचं कुठही आंदोलन सुरु नाही. जे आंदोलन केलं जात आहे ते फडणवीस, दरेकर आणि कोकणातील एका नेत्याच्या कार्यकर्त्यांचे आहे. आमचे आंदोलन आणि रॅली 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे असा गंभीर आरोप आज मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथील पत्रकार परिषदेत केला आहे.

मला कोणत्यातरी ट्रॅपमध्ये अडकवून मराठा आरक्षणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्नही सुरु आहे असा आरोप जरांगे पाटील यांनी करत  एका मराठा मोर्चाचे तीन तुकडे पाडण्याचे आणि आंदोलनात फूट पाडण्याचे काम यांनी केलं आहे असा घनाघात त्यांनी केला आहे. दरेकर हे मराठ्यांना खेटून त्यांना वेगळे आंदोलन करायला लावत आहे त्यांनी काही बुडबुडे तयार केले आहेत त्यामुळे मराठा समाजातील आंदोलकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच केले 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या मराठा रॅलीत हे लोक काय तरी घडवून आणतील असा आरोप त्यांनी केला आहे.

राजकारणासाठी आणि नावासाठी हपापलेले समाजातील काहीजण मराठा आरक्षण मोहिमेला मुद्दाम वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांनी एक अभियान सुरु केले असून त्या अभियानाच्या ट्रॅपमध्ये मराठा समाजाच्या युवकांनी अडकू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केली आहे.

बलिदान दिलेल्या मराठ्यांचे सुद्धा दिवस येतील आणि याचा बदला घेतला जाईल असा ईशारा त्यांनी यावेळी दिला आहे. मराठ्यांच्या बलिदानाशी कोणी खेळू नये. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्या बलिदानाला व्यर्थ जावू देणार नाही, मराठा समाजाला न्याय मिळणारच आणि दरेकरांनी सुरु केलेलं फसव अभियान, आंदोलनाला आता मराठा फसणार नाही असे शेवटी त्यांनी सांगितलं.

मातोश्रीवर मराठा आंदोलन – दरम्यान काही मराठा आंदोलकांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केलं आहे. मातोश्री बाहेर त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांना भेटल्याशिवाय आपण येथून जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तर हे सर्व आंदोलक हे सत्ताधाऱ्यांनी फूस लावल्यावरून तेथे दाखल झाले असून सध्या आमचे राज्यात कुठेही आंदोलन सुरु नाही असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.