आपण जनतेचे रक्षणकर्ते आहोत, वर्दीची शान-मान राखा – पोलीस उप महानिरीक्षक विजयकुमार मगर

अख्तर काझी

दौंड : आपण जनतेचे संरक्षण करणार आहोत, त्यामुळे आपल्या या वर्दीची आन-मान-शान आपण कायम ठेवावी. प्रशिक्षणानंतर आपल्या बंदोबस्ताचा काळ सुरू होणार आहे. आपल्यावरील सततच्या कामाचा तणाव कसा कमी करता येईल आणि आपणाला व्यसनापासून कसे दूर राहता येईल या दृष्टीने जवानांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत राज्य राखीव पोलीस बल पुणे परिक्षेत्रचे पोलीस उप महानिरीक्षक विजयकुमार यांनी व्यक्त केले आहे.

राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र (नानविज, दौंड) येथे पार पडलेल्या 69 व्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये नवप्रविष्ठ जवानांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नानविज प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य जयश्री देसाई, माजी प्राचार्य केंडे तसेच नवप्रविष्ठ जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी बोलताना विजयकुमार मगर म्हणाले की, वेगवेगळ्या राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाल्यानंतर जवानांना त्या ठिकाणी कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. यावेळी आपण आपल्या गटापासून, कुटुंबापासून दूर असताना मनाचा कणखरपणा व मानसिकता खूप चांगली ठेवावी लागते. आपण जे काम करत आहोत त्याच्या बद्दल आपण सतत आदर्श म्हणून समोर ठेवले पाहिजे. प्रशिक्षण केंद्रामध्ये आपण जे प्रशिक्षण घेतले आहे, आपल्यावर जे संस्कार येथे झाले आहेत ते जवानांनी कधीही विसरता कामा नये असे त्यांनी यावेळी म्हटले.

प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या जयश्री देसाई यांच्या संकल्पनेतून यावेळी बस अपहरणाचे मॉकड्रील सादर करण्यात आले जे दीक्षांत संचलन सोहळ्याचे आकर्षण ठरले. पर्यटकांची बस अतिरेक्यांनी हायजॅक केल्यानंतर आपले जवान त्यांची कशी सुटका करतात याचे प्रात्यक्षिक जवानांनी या मॉक ड्रिल मध्ये दाखविले.
सदर दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये प्राचार्य जयश्री देसाई यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना शपथ दिली तसेच अहवाल वाचन केले.

7 नोव्हेंबर 2024 ते 26 जुलै 2025 या कालावधी मधील 69 व्या सत्रामध्ये एकूण 456 जवानांना प्रशिक्षण देण्यात आले त्यापैकी 433 नवप्रविष्ठ जवान पात्र ठरले अशी माहिती देसाई यांनी यावेळी दिली. प्रशिक्षणादरम्यान उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या जवानांना यावेळी पुरस्कार देण्यात आले. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक प्रफुल्ल खडपकर व सहाय्यक पोलीस हवालदार सचिन देवडे यांनी केले.