अख्तर काझी
दौंड : दौंड शहरात जैन धर्मियांचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. अभिषेक, पूजा अर्चना, आरती, प्रार्थना, स्वाध्याय, आगम ग्रंथ वाचन करण्यासह जैन बांधवांकडून जप – तप व दान करण्यात आले.
जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त शहरातील रिलायन्स पंपाच्या पाठीमागील श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरातून पालखी काढण्यात आली. दौंड
-सिध्दटेक अष्टविनायक मार्गावरील श्री विमल
-
पार्श्वनाथ जैन मंदिरात जैन बांधवांनी स्नात्र पूजा केली. शहरातील श्री सकल जैन संघाच्या वतीने भगवान महावीर यांच्या पंचधातूची मूर्ती व तैलचित्राची श्री विमल-पार्श्वनाथ जैन मंदिर येथून सवाद्य मिरवणूक काढली होती.
भगवान महावीर यांचा जयघोष करण्यात आला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या स्थानकात सदर मिरवणूक विसर्जित करण्यात आली. श्रमणीय गौरव महासती सुयशाजी व महासती सुजयाजी यांनी या वेळी भगवान महावीर यांच्या जीवदया, अहिंसा, अनेकांतवाद या सार्वकालिक संदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले. भगवान महावीर यांच्या विराट कार्याचे नित्य स्मरण करीत त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून विधीपूर्वक मार्गक्रमण करावे. आई - वडिलांची सेवा, संकल्प करून तो सिध्द करणे, वचन दिल्यास त्याचे पालन करणे, धाडसी बनणे आणि साधना करण्याचे त्यांनी आवाहन केले.
स्तवनचे सादरीकरण झाल्यानंतर मंगलपाठाने सांगता करण्यात आली. विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी प्रतिमा पूजन करण्यात आले. दौंड जन्म कल्याणक समितीचे अध्यक्ष योगेश कटारिया, उपाध्यक्ष घिसुलाल जैन, सचिव सुशील शहा , खजिनदार रमेशलाल कटारिया, आदींनी संयोजनासाठी सहकार्य केले.