अख्तर काझी

दौंड : शहरातील दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी गटांना यंदा पर्याय म्हणून दौंडकर मतदारांनी महाविकास आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A), आम आदमी पार्टी) यांना संधी दयावी, कटारिया – जगदाळे गटाने शहराचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसा केलेला नाही त्यामुळे मतदारांनी यंदाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमचा विचार करावा असे आवाहन दौंड शहर महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले.
महाविकास आघाडी आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज जाहीर केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सचिन गायकवाड, राष्ट्रीय काँग्रेसचे हरीश ओझा, शिवसेना (उबाठा) पक्षाचे आनंद पळसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे सचिन खरात तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दौंड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक झाली असून अद्याप कोणत्या पक्षाला किती जागा द्यावयाच्या आहेत ते अद्याप निश्चित झालेले नाही.
नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला असे आरक्षण असल्याने महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशाने दौंडच्या नगराध्यक्ष पदासाठी मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारालाच संधी देणार हे मात्र जवळपास निश्चित मानले जात आहे. मित्र पक्षाच्या ताकदीनुसार तिकीट वाटप होणार असून युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहणार आहे.
महाविकास आघाडीचा मित्र पक्ष नाही परंतु उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता किंवा ताकद आहे असे असल्यास बाहेरील उमेदवाराचाही विचार करणार असल्याचे यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नगरपालिकेकडे स्वतःच्या मालकीच्या मुबलक जागा आहेत परंतु त्या जागांचा विकास करण्यास नगरपालिकेतील सत्ताधारी असमर्थ ठरले आहेत, महाविकास आघाडी विजयी झाल्यास नगरपालिकेची शाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.







