अख्तर काझी
दौंड : आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच व सात तसेच नानविज येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी राज्य सरकारच्या विविध योजनेतून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून झालेल्या व नियोजित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र विधान मंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने दौंड शहराचा दौरा केला.
यावेळी समितीचे प्रमुख आमदार राहुल कुल तसेच समिती सदस्य सुभाष देशमुख, निलेश राणे, भीमराव तापकीर, मिलिंद नार्वेकर ,वरून सरदेसाई, रईस शेख, हेमंत ओगले, उत्तम जानकर व आमदार विक्रम पाचपुते उपस्थित होते.
यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, दौंड तालुक्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या चार आस्थापना आहेत. 2014 पूर्वी या आस्थापनांची अत्यंत दुरवस्था होती. 2014 नंतर तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून (विधानसभेत लक्षवेधी, पत्रव्यवहार) या परिसरातील चारही आस्थापनांच्या, दवाखाने, हेडक्वार्टर्स, निवासस्थाने आदि कामांसाठी तब्बल दोनशे कोटी रुपये उपलब्ध करून देत कामे मार्गी लावलेली आहेत.
कर्तव्याच्या बाबतीत आपण पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा करतो, परंतु शासनाचे त्यांच्या प्रति असणारे कर्तव्य याची जाणीव करून देऊन आपण या व्यवस्थेला भरीव निधी उपलब्ध करून दिला. समितीचा दौरा मिसिंग लिंक पासून सुरू होऊन कुरकुंभ ,चाकण औद्योगिक वसाहत, राज्य राखीव पोलीस बलगट आणि आपल्या सर्वांच्या व रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या रिंग रोडला भेट असा पूर्ण करीत आहोत.
राज्य राखीव पोलीस बलाने जे प्रस्ताव तयार केलेले आहेत त्या संदर्भामध्ये माझ्या समितीमधील सहकाऱ्यांनी जर थोडासा धक्का दिला तर जे शासन स्तरावर प्रस्ताव प्रलंबित आहेत ते मार्गी लागतील. महायुती सरकारने आम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये चांगले करण्याचा आम्ही प्रयत्न करू याचीच खात्री देण्यासाठी आम्ही येथे उपस्थित झालो आहोत.
संपूर्ण पोलीस प्रशासन दिवस- रात्र राबत असतात त्यामुळे आमचे सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या प्रती चांगले करावे ही खात्री आम्ही सगळे देत आहोत. आपले सगळे प्रस्ताव जे तुम्ही आम्हाला देणार आहात त्यासाठी योग्य ठिकाणी पाठपुरावा करून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी पोलीस प्रशासनाला यावेळी दिला.