पुण्यात महामोर्चा, कडकडीत बंद… हजारो लोकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे : राज्यात होत असलेल्या महापुरुषांच्या अवमान प्रकरणी आज पुणे बंद ची हाक देण्यात आली आहे. पुण्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून सर्व धर्मीय आणि विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी मिळून महा मूक मोर्चा काढला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. युग पुरुषांवरील वक्तव्यांमुळे खा.उदयन राजे भोसले यांनीही मोठी नाराजी व्यक्त केली होती. आणि राज्यपाल कोश्यारी यांना त्वरित राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी केली होती.

या संपूर्ण प्रकारानंतर वातावरण शांत होत नाही तोच पुन्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्यात संतापाची लाट उसळली आणि काही कार्यकर्त्यांनी याबाबत अधिक आक्रमक होऊन शाईफेक प्रकरण घडले. त्यामुळे नेत्यांनीहि वक्तव्ये करताना ती जबाबदारीने करावीत अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे.

आज पुण्यात सर्वत्र शुकशुकाट असून दररोज गजबजलेले लक्ष्मी रोड आणि पुण्यातील इतर परिसर एकदम शांत झाल्याचे दिसत आहेत. पुणे शहरात निघालेल्या मोर्चामध्ये छत्रपती उदयन राजे भोसले, शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांसह अनेक पदाधिकारी सामील झाले आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्यातील व्यापारी दुकाने बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.