Loksabha Election 2024
राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या लोकसभा उमेदवारांच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाही. महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीचे गणित फिस्कटताना दिसत आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी वंचित शिवाय लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 17 जागांची केलेली मागणी महाविकास आघाडीकडून अमान्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काल रात्री उशीरा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली ज्यामध्ये वंचित च्या 17 जागांबाबत चर्चा करण्यात आली.
लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर आता प्रत्येक पक्षाने आपले जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे करता येतील याकडे लक्ष केंद्रित केले आहे. मात्र एकीकडे महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्या युत्यांमुळे घटक पक्षांची कुचंबाना होताना दिसत आहे. कुठे एक किंवा दोन जागा देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे यातील घटक पक्ष हे नाराज होऊन दुसरे स्वतंत्र पर्याय शोधू लागले आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी निवडला मोठा पर्याय
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता महाविकास आघाडीशिवाय लढण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना त्यातून काही मार्ग निघत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याशी लोकसभा निवडणुकीच्या जागांबाबत चर्चा सुरू केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीकडून आंबेडकर यांना फक्त दोनच जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. मात्र त्या जागाही बिन भरवश्याच्या असल्याने आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. महाविकास आघाडीतील या गोंधळाच्या स्थितीमुळे आंबेडकर यांनी शेंडगे यांच्या माध्यमातून नवे पर्याय शोधायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे.