वरवंडच्या श्री.गोपीनाथ महाविद्यालय प्रांगणात ‘महा भोंडला’ उत्साहात साजरा

दौंड : वरवंड ग्राम शिक्षणसंस्थेच्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री.गोपीनाथ महा विद्यालयामध्ये नवरात्र उत्सवाअंतर्गत येणारा भोंडला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या आनंदी, उत्साही वातावरणात पार पडला.

अश्विन पक्षामध्ये हस्तनक्षत्रात खेळला जाणारा भोंडला या कार्यक्रमाचे आयोजन सौ.योगिनीताई दिवेकर यांच्या कल्पनेतून श्री.गोपीनाथ विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 5वी ते 12वी पर्यंतच्या साधारण 700 ते 800 मुलींनी सहभाग घेतला होता. लहान मुलींपासून ते अगदी महिला शिक्षिका व महिला पालकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

जुने पारंपारिक खेळ, गाणी, उखाणे, लोककला लोप पावत चाललेला असताना अशा पारंपारिक भोंडल्यासारख्या खेळांचे व भोंडला गीतांचे जतन करून ते येणाऱ्या नवीन पिढीपर्यंत याचे स्थित्यंतर करून ते पुढच्या येणाऱ्या पिढीने जपले पाहिजे हा प्रामाणिक व प्रांजल हेतू दौंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.योगिनी दिवेकर यांनी डोळ्यासमोर ठेवत हा कार्यक्रम आयोजित केला होता. रोजच्या धकाधकीच्या व तणावाच्या वातावरणातून बाहेर येऊन तरुणी, गृहिणी व महिलांच्या आनंद प्राप्तीसाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे सौ.योगिनी दिवेकर यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमांमध्ये आदिशक्ती आदिमाया यांच्या विविध रंगात रंगून शाळकरी मुली शिक्षिका व महिला पालकांनी फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणत विद्यार्थिनी व महिला शिक्षकांनी भोंडला नृत्य आणि वैयक्तिक नृत्य सादर केले. श्रीसूक्त पाठाचे पठण सौ.काटकर व इतर महिला शिक्षिकांनी यावेळी केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.भारती शेवाळे (पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष) या उपस्थित होत्या. सौ. चोरघडे (शेवाळवाडी सरपंच) व केडगाव परिसरामध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर स्वाती लवंगरे यांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. सौ.योगिनी दिवेकर (दौंड तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्ष) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

सप्तरंगांनी नटलेल्या रांगोळीच्या व महिलांच्या सहवासात गजांत लक्ष्मीचे म्हणजे हत्तींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद, विद्यालयाचे प्राचार्य श्री. शेलार, उपप्राचार्य श्री. गावडे, उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्राध्यापक इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध खेळांचे व गायनांचे आयोजन करण्यात येऊन प्रमुख पाहुणे, विद्यार्थिनी, महिला पालक व शिक्षिका यांना खिरापतीचे वाटप करण्यात आले.