मुंबई : सध्या राज्यात पेट्रोल, डिझेल, महागाई यावर भाष्य न होता प्रार्थनास्थळावरील भोंग्यावरून वातावरण तापले आहे. काही राजकीयनेत्यांनी याबाबत डेडलाईन दिली आहे मात्र, भोंगे काढण्याचे काम सरकारचे नाही ते याबाबत काही करणार नाही असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले असून आवाजाची मर्यादा मात्र सर्वांना पाळावी लागेल असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संगितले आहे. ते मस्जिदवरील भोंगे या संदर्भात घेतलेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर ते बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि गृहखात्याला विनंती करत 3 मे ची डेडलाईन दिली आहे. आणि मस्जिदवरील भोंगे काढण्याबाबतचे फर्मान सोडले आहे. राज ठाकरे यांनी इशारा देताना, आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही त्यामुळे 3 मेपर्यंत भोंगे काढून घ्या असा इशारा त्यांनी दिला आहे.
एका समाजासाठी एक निर्णय आणि दुसऱ्या समाजासाठी एक निर्णय असे होणार नाही असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट करत केंद्र सरकारनं देश पातळीवर एक नियम करावा आणि त्या नियमांची अंमलबावणी देशभर करावी, असेह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. सुप्रीम कोर्टाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंग्यांवर बंदी घातली आहे आणि इतर वेळी आवाजाची मर्यादा घालण्यात आली आहे असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.