अख्तर काझी
दौंड : सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी दिलेली आहे, कुठल्याही प्रकारचे धार्मिक स्थळांवरील भोंगे काढा असे न्यायालयाच्या निर्णयात सांगितलेले नाही. त्यामुळे दौंड मधील बंधुभावाच्या वातावरणाला जर कोणत्याही समाजाच्या व्यक्तीकडून बिघडविण्याचा प्रयत्न झाला तर पोलीस प्रशासन त्या व्यक्तीची, संघटनेची गय करणार नाही असा इशारा दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी दिला. रमजान ईद व शहरातील शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांनी आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मा.नगराध्यक्ष शितल कटारिया, बादशहा शेख, इंद्रजीत जगदाळे तसेच मा. नगरसेवक अरुणा डहाळे, शहानवाज पठाण,वसीम शेख, पुनम पडवळकर, आरपीआय चे पदाधिकारी रविंद्र कांबळे, नागसेन झेंडे, भारत सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ता. अध्यक्ष आप्पासो पवार,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष फिरोज खान, काँग्रेस पक्षाचे तन्मय पवार, विठ्ठल शिपलकर,शिवजयंती उत्सव समितीचे मा. अध्यक्ष राजन खटी, आलमगीर मशिदीचे विश्वस्त युसुफ इनामदार तसेच विविध पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात तापलेल्या भोंगा प्रकरणावर बोलताना धस म्हणाले की, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही नवीन आदेश किंवा निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 2005 साली भोंग्या बाबत जो निकाल दिला आहे त्याचीच अंमलबजावणी पोलीस प्रशासन करीत आहे. याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी दिलेली आहे. कुठल्याही प्रकारचे भोंगे काढा असे न्यायालयाच्या निर्णयांमध्ये सांगितलेले नाही. फक्त भोंगे लावण्याकरिता आवश्यक असणारी परवानगी घेणे मात्र जरुरीचे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करणार आहे. दौंड मधील बंधुभावाच्या वातावरणाला जर कोणत्याही समाजाच्या किंवा संघटनेच्या व्यक्तीकडून बिघडविण्याचा प्रयत्न झाला तर कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशाराही धस यांनी यावेळी दिला आहे. परंतु दौंडकर पोलीस प्रशासनावर अशी वेळच येऊ देणार नाही याचीही आम्हाला खात्री आहे असेही ते म्हणाले. शिवजयंती उत्सवामध्ये पोलीस प्रशासन सामील होणार आहे व रमजान ईद मध्येही शीरखुर्मा खायला आम्ही येणार आहोत अशी आठवणही धस यांनी करून दिली.
रमजान ईद व शहरातील शिवजयंती जल्लोषात साजरी करणार आहोत, या उत्सवांना कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू देणार नाही अशी ग्वाही उपस्थित दौंडकरांनी पोलीस प्रशासनाला यावेळी दिली.