– सहकारनामा
मुंबई :
राज्यात उद्या शनिवारी 10 एप्रिल रोजी ठरल्याप्रमाणे 2 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन होणार आहे, मात्र आता राज्यात सरसकट 3 ते 4 आठवडे लॉकडाउन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
यासाठी उद्या शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक होणार असून गतवर्षीप्रमाणे लॉकडाऊन लावण्याबाबत विचार विनिमय होणार आहे.
लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी चर्चा होणार असून या चर्चेसाठी राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलविण्यात आले आहे. बैठकीत महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांच्या नेत्यांसह भाजप, मनसे, आरपीआय, सपाचे अनेक बडे नेते सहभागी होतील असा अंदाज आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांच्या माहितीनुसार सध्याची परिस्थिती पाहता राज्यात 3 ते 4 आठवड्यांपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लागू केले जाऊ शकते. राज्यात सध्यातरी हे लॉकडाउन फक्त शनिवार व रविवारी घोषित केलेले आहे. मात्र राज्य सरकारने या अगोदर स्पष्ट केले होते की जर कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली नाही तर मात्र राज्य सरकार नव्याने संपूर्ण लॉकडाउनचा विचार करू शकते.