Lockdown : दौंड शहरात पुन्हा लॉकडाऊन! अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद, सामान्य नागरिक, व्यापारी यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांना आनंद वाटत नाही, पण.. – पोनी.सचिन पाटील



– सहकारनामा

दौंड : (अख्तर काझी)

दौंड शहर व तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या रोजच झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने मिनी लॉकडाऊन ऐवजी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश आल्याने दौंड पोलिसांनी शहरातील दुकाने अचानक बंद केली, त्यामुळे व्यापाऱ्यांचा गोंधळ उडाला. दौंड व्यापारी महा संघाचे अध्यक्ष राजेंद्र ओझा व दौंड मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दौंड पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांची यासंदर्भात भेट घेतली. यावेळी सचिन पाटील म्हणाले की संपूर्ण जिल्ह्यासह दौंड शहर व तालुक्यातही कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण लॉकडाऊन चा निर्णय घेतलेला आहे, त्या  अनुषंगाने पोलिसांनी येथील व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करावयास सांगितली. कोरोना चा प्रादुर्भाव आणखीन वाढू नये तसेच या संसर्गाची साखळी तुटावी या उद्देशाने हा निर्णय झालेला आहे त्यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता इतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, हॉटेल व्यवसायिकांना पार्सल सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. 

शहरातील सामान्य नागरिक किंवा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात पोलिसांना अजिबात आनंद नाही परंतु या महा मारीला रोखण्यासाठी म्हणून पोलीस प्रशासनाला नियमांची कठोर अंमलबजावणी करावी लागणार आहे हे सर्वांनीच समजून घेऊन प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे असे आवाहन सचिन पाटील यांनी दौंड करांना केले आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरामध्ये जमावबंदी असणार आहे तर सायंकाळी 6 नंतर संचारबंदी लागू असणार आहे या वेळेत नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. नोकरी निमित्ताने किंवा वैद्यकीय उपचारासाठी म्हणून घराबाहेर पडावे लागणाऱ्या नागरिकांना पोलिसांचे सहकार्य असणार असल्याचे सचिन पाटील म्हणाले.

संपूर्ण लॉक डाऊन लागू करण्याचा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला येथील दोन्ही व्यापारी संघाचा विरोध आहे, प्रशासनाने संपूर्ण लॉक डाऊन ऐवजी मिनी लॉक डाऊन चा पर्याय व्यापाऱ्यांना द्यावा अशी त्यांची मागणी आहे.

त्यामुळे व्यापारी संघ तहसीलदार यांची भेट घेऊन दोन्ही संघाची भूमिका मांडणार असून यावेळी संघाच्या मागणीचे निवेदनही तहसीलदार यांना देण्यात येणार असल्याचे व्यापारी संघाने सांगितले आहे.