पुण्यात अक्षरशः ‘त्या’ चौघांना जाळून मारण्यात आले

पुणे : पुण्यातील हिंजवडी येथे घडलेल्या घटनेवरून संपूर्ण पुणे हादरून गेले आहे. एका किरकोळ कारणावरून चौघांना जिवंत जाळण्यात आल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. अगोदर अपघात वाटणारे हे प्रकरण चौघांचा प्लॅन करून खून करण्यात आल्याचे आता पोलीस तपासात समोर आले आहे.

हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन येणार्‍या टेम्पो ट्रॅव्हल्स बसमध्ये हे हत्याकांड घडले असून दिवाळीचा पगार न दिल्याने व कामगारांशी झालेल्या वादातून ट्रॅव्हल चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्सच्या सीट खाली केमिकल टाकून ते पेटवून देत चौघांचा खून केल्याचे आता पोलीस तपासात उघड होत आहे. कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याचे आता समोर आले.


हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन येणार्‍या टेम्पो ट्रॅव्हल्स बसमध्ये आग लागून यामध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. अगोदर अपघात वाटणारी ही घटना पोलीस तपासात खून असल्याचे समोर येताच पुण्यात एकच खळबळ माजली होती. केवळ दिवाळीचा पगार न दिल्याने वरील आरोपीने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली होती असा मोठा खुलासा पोलीस चौकशीत झाला आहे.

बसचालक जनार्दन हंबर्डीकर असे या चालकाचे नाव असून शंकर कोंडीबा शिंदे (वय ६३, रा. नर्‍हे आंबेगाव), गुरुदास खंडू लोखरे (वय ४०, रा. हनुमाननगर, पौड फाटा) सुभाष सुरेश भोसले (वय ४५, रा. त्रिलोक सोसायटी, वारजे माळवाडी), राजेंद्र सिद्धार्थ चव्हाण (वय ४२, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक) अशी मृत्युमुखी पडलेल्या चार कामगारांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण घटनेची माहिती दिली असून आरोपीने या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे त्यांनी सांगितले.