मुंबई : सहकारनामा
दौंड तालुक्यातील बिबट्याच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोजना करण्याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे.
आमदार कुल यांनी आपल्या निवेदनामध्ये सध्या दौंड तालुक्यात बिबट्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, बिबट्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करायला सुरवात केली आहे. नुकतेच पारगाव येथे एकाच वेळी ४ बिबटे एकत्र नागरी वस्ती मध्ये दिसून आले आहे. तर वरवंड येथेही बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या पाच बकऱ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
हि सर्व परिस्थिती आणि बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बिबट्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता व मनुष्यवस्तीत त्यांचा वावर वाढत असल्यामुळे, भविष्यात बिबटे मनुष्यावर देखील हल्ले करण्याची शक्यता आहे. हा वाढता धोका लक्षात घेता बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी व नागरिक करीत आहे.
त्यामुळे दौंड तालुक्यातील बिबट्याच्या बंदोबस्त करण्याबाबत व त्याला पकडणेसाठी आवश्यकतेनुसार पिंजरे लावण्याबाबत आपणाकडून ठोस उपयोजना करण्यात याव्यात अशी विनंती आमदार कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री संजय राठोड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.