जोपर्यंत शिवभक्ती कृतीमध्ये उतरत नाही तोपर्यंत शिवजयंती साजरी करण्याचा उपयोग नाही, दौंड मधील कटारिया महाविद्यालयात शिवचरित्रावर व्याख्यान

अख्तर काझी

दौंड : भिमथडी शिक्षण संस्थेच्या स्वर्गीय किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयात 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने शिवव्याख्याते शशीन कुंभोजकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया यांच्या हस्ते करण्यात येऊन काकाजींच्या व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कुंभोजकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये योगदान असणाऱ्या वेगवेगळ्या मावळ्यांची,जनतेची, लष्करी शिस्त, पहिले नौदल, जलव्यवस्थापन, लढाई पूर्वीचे नियोजन इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली. जोपर्यंत शिवभक्ती कृतीमध्ये उतरत नाही तोपर्यंत शिवजयंती साजरी करण्याचा उपयोग नाही असे त्यांनी सांगितले. आजच्या पिढीला शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे त्यांच्या विचारांमध्ये एक ताकद होती.

तरुण आणी तडफदार युवक वर्गात छत्रपतींच्या विचारांची लागण झाल्याशिवाय उद्याचे भारताचे भविष्य घडणार नाही आणि त्यावर जेव्हा छत्रपतींच्या विचारांचा खऱ्या अर्थाने अभ्यास करून त्या विचारांचा जीवनात वापर होणे सुरु होईल तेव्हाच आपण स्वराज्य निर्मिती चे छत्रपतींचे स्वप्न साकार होईल. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती निर्माण होण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण ननवरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र यांनी दिली.