अहमदनगर येथून चोरून आणलेली स्विफ्ट कार ‛यवत’जवळ पकडली, LCB कडून ‛पारगाव’ येथील आरोपी जेरबंद



दौंड : सहकारनामा

अहमदनगर येथून चोरून आणलेली स्विप्ट कार अवघ्या ७ तासात आरोपीसह पुणे-सोलापूर महामार्गावर यवत येथून ताब्यात घेण्यात पुणे ग्रामिण LCB पथकाला यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २२.१.२०२० रोजी आरणगाव शिवार ता.जि.अहमदनगर येथील सारंगी हॉटेल समोरून पहाटे ०४.०० वा.चे सुमारास फिर्यादी शिवाजी अशोक मोरे (वय ३४ वर्षे आरणगाव शिवार ता.जि.अहमदनगर) यांच्या मालकीची मारुती स्विप्ट कार नंबर एमएच १६ बीएच ६६९६ ही त्यांच्या हॉटेलमध्ये कामास असलेला वेटर माऊली बांदल याने त्यांच्या संमतीशिवाय चोरीच्या उद्देशाने चोरून नेली होती. त्याबाबत फिर्यादी यांनी अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनला दिलेले तक्रारीवरून अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत यांचेकडून सदर कार चोरीची माहिती नगर जिल्हयातील व शेजारचे जिल्हयातील पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना व्हॉटसअप ग्रुपवर कळविण्यात आलेली होती. 

पुणे ग्रामीण  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सदर कार चोरीची माहिती व्हॉटसअप ग्रुपवर मिळालेने त्यांनी ती स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व अमलदारांना देवून कारचा व आरोपीचा शोध घेणेबाबत कळविले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे-सोलापूर रोडने पेट्रोलींग करीत असताना सदर पथकास उरळीकांचन चौक येथे पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणारी एक बिगर नंबर असलेल्या स्विप्ट कारचा संशय आलेने तिला इशारा करुन थांबवण्याचा प्रयत्न केला. 

परंतु ती न थांबवता भरधाव वेगाने गेल्याने सदर पथकाने त्या कारचा पुणे-सोलापूर रोडने पाठलाग करुन सहजपुर फाटयाचे पुढे गाडी आडवी मारून स्विप्ट कार थांबवून त्यातील आरोपी माऊली उर्फ भावडया मच्छिंद्र बांदल (वय ३१ वर्षे रा.पारगाव ता.दौंड जि.पुणे) यास चोरीची स्विप्ट कार किं रु. ५,००,०००/- (पाच लाख) यासह ताब्यात घेतले व सदर कार अहमदनगर तालुका पोलीस स्टेशन इथून चोरीस गेली असल्याची खात्री केली.

सदर आरोपी व गुन्हयात चोरलेली स्विप्ट कार पुढील कारवाईसाठी अहमदनगर तालुका पो.स्टे. चे ताब्यात दिलेली आहे.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर  

१) यवत पो.स्टे. गु.र.नं. ७४६/१९ भादंवि क.३९२

२) यवत पो.स्टे. गु.र.नं. १०१७/१८ भादंवि क.२२९(अ)

 ३) बारामती तालुका पो.स्टे. गु.र.नं. ९२/१७ भादंवि क.३७९

४) पुणे रेल्वे पो.स्टे. गु.र.नं. २९४/१६ भादंवि क.३७६,३६६ बाललैंगिक अत्याचार अधि क.४,६

५) बिबवेवाडी पो.स्टे. पुणे शहर गु.र.नं. ४/१५ भादंवि क.२२४ 

 ६) यवत पो.स्टे. गु.र.नं. ९/१५ भादंवि क.३७९

७) यवत पो.स्टे. गु.र.नं. ३५३/१४ भादंवि क.३९२,३४

वरील प्रमाणे सात गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोसई शिवाजी ननवरे, सफौ. दत्तात्रय गिरमकर, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.