बापरे… पाटस टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्डकडून तलवार, गावठी पिस्तुल आणि काडतुसे जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी (LCB) शाखेची कामगिरी



– सहकारनामा

पुणे : 

दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर काम करत असलेल्या सिक्युरिटी गार्डकडून एक तलवार, गावठी पिस्तुल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करून त्यास अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामिणचे पोलीस अधीक्षक  यांच्या आदेशाने वॉन्टेड फरार आरोपीचा शोध घेत असताना LCB टिमने पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन हद्दीत पाटस ता.दौंड जि.पुणे येथे बुलेट मोटरसायकलवर संशयास्पदरित्या मिळून आलेला इसम धनाजी मारुती माकर (वय ४४ वर्षे रा.पडवी, गायकवाड वस्ती, ता.दौंड जि.पुणे) यास ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव  कमरेला बाळगलेले १ गावठी पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, १ तलवार, १ बुलेट मोटरसायकल व मोबाइल असा एकुण किं.रु. १,७०,४००/- (एक लाख सत्तर हजार चारशे) चा मुद्देमाल हस्तगत केला. 



आरोपी हा पाटस टोलनाक्यावर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली. या आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ प्रमाणे कारवाई करणेसाठी जप्त मुद्देमाल व आरोपी वैद्यकिय तपासणी करून  यवत त्यास पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सपोनि. सचिन काळे, पोहवा. महेश गायकवाड,  पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड.पोहवा. मुकुंद कदम यांनी केलेली आहे.