बाबो.. शिरूर येथील ‛हॉस्पिटल,’ कोविड सेंटर चालवणारा डॉक्टरच निघाला ‛बोगस’, ‛पदवीच’ नव्हे तर नावही निघाले ‛बोगस’… LCB ने केली अटक



– सहकारनामा

पुणे : पुणे जिल्ह्यात असणाऱ्या शिरूर तालुक्यात खळबळच एक घटना घडली असून या तालुक्यातील कारेगाव येथे श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणारा डॉक्टरच बोगस निघाला असून  या बोगस डॉक्टरला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) च्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा LCB यांच्याकडे श्री मोरया हॉस्पिटल येथे डॉक्टर व्यवसाय करणारा मेहमूद फारुक शेख हे बोगस नाव आणि बोगस पदवी दाखवून श्री मोरया  मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चालवीत होता. याबाबतची माहिती LCB चे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठांना देऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक  मिलिंद मोहिते यांनी सदरचा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याची तात्काळ चौकशी करून उचित कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना दिले होते.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे शिवाजी ननावरे, सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण, पोलीस हवालदार महेश गायकवाड दत्तात्रय, तांबे जनार्दन शेळके, पोलीस नाईक विजय कांचन, गुरु जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ या पथकाने कारेगाव ता शिरूर येथे जाऊन श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणारे महेश पाटील यांना ताब्यात घेतले. 

त्यांची विचारपूस व माहिती घेतल्यानंतर कारेगाव श्री मोरया हॉस्पिटल चालवणारे महेश पाटील हे त्यांचे बनावट आणि MBBS चे बोगस प्रमाणपत्राच्या आधारे दोन वर्षे दोन रुग्णांवर उपचार करून त्यांची फसवणूक करीत असल्याचे तपासातून समोर आले.

महेश पाटील याचे खरे नाव मेहमूद फारुक शेख असे असल्याचेही यावेळी समोर आले त्यामुळे त्यास LCB पथकाने ताब्यात घेऊन रांजणगाव औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. 

या बाबत शीतलकुमार राम पाडवी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे सुरू असलेल्या श्री मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या 23 कोविड रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती मिळत असून या रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याची माहिती यावेळी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली आहे.

या घटनेचा अधिक तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करीत आहेत.