मुंबईतून पुणे जिल्ह्यात ड्रग्ज सप्लाय करणारा ड्रग माफिया पुणे ग्रामिण LCB कडून जेरबंद, पुणे जिल्ह्यातील त्याच्या 2 साथीदारांनाही जेलची हवा



पुणे : सहकारनामा 

पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखा LCB पथकाने दि. ४ जानेवारी २०२१ रोजी कामशेत ता.मावळ येथे छापा टाकून अंमली पदार्थाची विक्री करणारा इसम शिवाजी मारुती कडू (वय ३२ वर्षे रा.कुरवंडे, ता.मावळ जि.पुणे) याचे मारुती ब्रिजा कारमधून ५२ ग्रॅम २० मिली ग्रॅम व सोमनाथ वसंत बालगुडे (वय ३० वर्षे रा.पाथरगाव ता.मावळ जि.पुणे) याचे अंगझडतीत १५ ग्रॅम १७ मिली ग्रॅम असे एकूण १,३४,७४०/- रुपये किंमतीची ६७ ग्रॅम ३७ मिली वजनाचे मेफेड्रोन (Drugs) आंतरराष्ट्रीय बाजार किंमत रु २००० प्रती ग्रॅम प्रमाणे व ५,३३,३६०/- रु. किंमतीची कार, मोटारसायकल, वजनकाटा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ६,६८,१००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता. 

त्याबाबत कामशेत पोलिस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम  करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २१(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये सध्या दोन आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत.

सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास  गुन्हयातील अंमली पदार्थ (ड्रग्ज) सप्लाय करणारा आरोपी नामे हसन बकरहुसेन सय्यद (वय ३२ वर्ष रा.पळस्पे ता.पनवेल जि.रायगड) हा पनवेल येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचुन ड्रग माफिया हसन सय्यद यास पनवेल नवी मुंबई येथून ताब्यात घेतले.

ड्रग माफिया हसन सय्यद याचे आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपी हसन सय्यद यास पुढील तपास कामी कामशेत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिलेले असून त्याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो. अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहा. उपनिरीक्षक विजय पाटील, प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.