लोणी काळभोर : सहकारनामा ऑनलाइन(महेश फलटणकर)
हवेली तालुक्यातील उरुळीकांचन येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ताडी आणि दारूच्या दोन अड्डयांवर छापा टाकून २,०४०/- रुपयाची ताडी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एल.सी.बी.) पथकाने केली असल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, विजय माळी, राजेंद्र पुणेकर, महेश गायकवाड, निलेश कदम, गुरू गायकवाड, दैवशिला डमरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सदर पथकाने उरूळीकांचन दुरक्षेत्राचे पोलीस नाईक विजय घाले व नाना पवार यांची मदत घेवून सायंकाळचे सुमारास जयमल्हार रोड, सुतार आळी येथे दोन ठिकाणी अचानक छापे टाकून बिगर परवाना व बेकायदेशीरपणे विक्रीसाठी साठा केलेली ९ लिटर ताडी, विदेशी दारू व इतर साधने असा माल जप्त केला. बेकायदेशिर ताडी अड्डा चालविणारा इसम अनंता नागप्पा भंडारी व दारू विक्री करणारी महिला दोघे रा.उरुळीकांचन, जयमल्हार रोड ता.हवेली जि.पुणे यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन करीत आहेत.