|सहकारनामा|
पुणे : दि.३०/११/२०२० रोजी ०१.०० वा.चे सुमारास मौजे म्हसोबाचीवाडी ता.इंदापूर जि.पुणे गावचे हद्दीत आरोपी १) बाळा पोपट दराडे २) विजय बाळू गोफणे ३) शुभम ओमप्रकाश खराडे व इतर २ अनोळखी आरोपी यांनी फिर्यादी संजय तुकाराम थोरवे (म्हसोबाचीवाडी ता.इंदापूर जि.पुणे) यांना बारामती शहर, बारामती तालुका व भिगवण या पोलीस स्टेशनला दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याचे कारणावरून फिर्यादीचे घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून आरोपी नं. १ ते ३ यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉडने व गजाने फिर्यादीचे डोक्यावर, बरगडीवर व पायावर मारहाण करून उशीजवळ ठेवलेले घड्याळ व रोख रक्कम घेतली होती व फिर्यादीची पत्नी योगिता हिचा गळा दाबून तिच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून तिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
आरोपी नं. ४ व ५ यांनी ‘संज्याला खल्लास करा, जिवंत सोडू नका’ असे म्हणून फिर्यादीस मारहाण केली. फिर्यादीचा ओरडण्याचा आवाज ऐकून फिर्यादीचा भाऊ येत असल्याचे पाहून आरोपी नं. १ बाळा दराडे याने त्याचे कमरेला असलेला पिस्टल काढून फिर्यादीचे डोक्याला लावून, ‘आज वाचला तर पुढच्यावेळी गोळ्या घालील.’ असे म्हणून पांढर्या चार चाकी गाडीत निघून गेले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिगवण पोलीस स्टेशनला गु.र.नं. ४३०/२०२० भादंवि क.३९७,३०७,४५२,४२७, ५०६, ३४ आर्म ॲक्ट कलम ३,२५ अन्वये खुनाचा प्रयत्नासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
तपासामध्ये सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) कलम लावण्यात आलेले होते. सदर आरोपी हा मोक्कातील आरोपींना फरार कालावधीमध्ये दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू पुरवून मदत करीत असल्याची माहिती मिळाली होती.
आज रोजी सदर गुन्हयातील आरोपी वंजारवाडी फाटा येथे येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाल्याने गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी वेशांतर करून सापळा रचून आरोपी राजेंद्र उर्फ एक्का महादेव चौधरी (वय 20 राहणार वंजारवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे) यास पाठलाग करून जेरबंद केले आहे. सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास पुढील कारवाईसाठी भिगवण पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पो.उप-निरीक्षक शिवाजी ननवरे, पोहवा. रविराज कोकरे, पोहवा. अनिल काळे, पोना. विजय कांचन पो.ना. अभिजीत एकशिंगे, पो. काँ. धीरज जाधव, पो.काँ.दगडु विरकर यांनी केलेली आहे.