पुणे : बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी विज्ञान केंद्र माळेगाव खु. येथे आयोजित ‘कृषिक २०२५’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केली. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर, आयआयटी खरगपूरचे शास्त्रज्ञ डॉ. पियुश सोनी, ॲग्री पायलटचे प्रकल्प संचालक प्रशांत मिश्रा, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेयरमन राजेंद्र पवार, विश्वस्त प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी उपस्थित होते.
जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येतो, आता शेतकऱ्यासमोर दुष्काळ, पर्जन्यमानाची अनियमितता, घटते जमिनीचे क्षेत्र अशी विविध प्रकारची आव्हाने उभी असून त्यावर मात करण्याकरीता प्रयत्न करावेत. राज्यात कृषी विषयात विविध संशोधन होत असून यामधून नव्याने उदयास आलेली बी-बियाणे, पिके, फुले व फळांच्या जातींची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल.
उत्पादनात वाढ होण्याच्यादृष्टीने शेतकऱ्यांनी ऊसक्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, उसाच्या नवनवीन वाणाची लागवड करावी. शेतमालाची उत्पादकता वाढविण्याकरीता राज्य व केंद्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले.