‘वाखारी’ परिसरात ‘भू-माफियांचा’ सुळसुळाट, शेतमजूर, भूमिहीन, शर्तीच्या जमिनी लाटण्यासाठी एजंटांची फिल्डिंग

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील वाखारी (वाकडापूल) येथे असणाऱ्या माळरानावर काही कंपन्या सुरु झाल्याने येथे जमिनीचे भाव वधारण्यास सुरुवात झाली आहे. कोटींच्या जमिनी लाखांत आणि लाखांच्या जमिनी हजारोंत गुंडाळण्यासाठी या ठिकाणी आता भू माफिया सरसावले आहेत. त्यामुळे या परिसरात भू माफिया एजंटांचा मोठा सुळसुळाट झाला असल्याचे पहायला मिळत आहे.

वाखारी येथील माळरान, वाघढव आणि खोरच्या सिमेलगत असणाऱ्या भूमिहीन, शेतमजूर यांना मिळालेल्या कुळकायद्याच्या आणि नविन शर्तीच्या जमिनी काहींनी अतिशय कमी भावात केवड्या रेवड्या किंमतीमध्ये लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शासनाकडून शेत जमिनी मिळालेल्या गरजू लोकांना पैशाचा मोह दाखवायचा, त्यांच्या जमिनीची एक ठराविक किंमत करायची, गरजू लोकांना तुमच्या जमिनीवर शर्त असा शेरा आहे. ती आमच्याशिवाय शर्त उठू शकत नाही, त्याला खूप खर्च येतो, वशीला लागतो त्यामुळे तुम्हाला या जमिनीचा काहीच फायदा नाही उद्या त्या जमिनीचे काहीही होऊ शकते अशी भीती या गोरगरिबांना दाखवायची आणि ही जमीन काही लाख रुपयांमध्ये लाटून ती आहे अशी पुढे करोडो रुपयांना फिरवायची असा काहीसा धंदा या लोकांनी येथे मांडला आहे.

शासनाने ज्या गरजू भूमिहीन लोकांना त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी या जमिनी दिल्या त्या जमिनी आता हे एजंट लोक बिनताबा साठेखत, पॉवर ऑफ अ‍टॉर्नी करून या लोकांना भूमिहीन करत असल्याचे दिसत आहे. अनेकांनी या ठिकाणच्या जमिनी किरकोळ पैसे देऊन बळकावल्या आहेत आणि आजही असे प्रकार सुरु आहेत. अनेकांनी येथील जमिनी लाटण्यासाठी गैरप्रकार अवलंबले आहेत तेही आता हळूहळू बाहेर निघू लागले आहेत. काहींनी शेतकरी असल्याचे बोगस दाखले मिळवून जमिनींची खरेदी केल्याची चर्चाही होत आहे. त्यामुळे आता शासनाने याकडे लक्ष देऊन भूमीहीन होणाऱ्या शेतकऱ्यांना यापासून वाचविण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे अन्यथा काही वर्षांमध्ये पुन्हा भूमिहीन, शेतमजूर लोकांची संख्या वाढत जाऊन त्यांच्या कुटुंबांना राहण्यासाठी सुद्धा हे भुमाफिया जागा शिल्लक ठेवतील की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे.