महिला पोलीस आत्महत्या प्रकरणी पोलीस नाईक ‛वाल्मीक अहिरेच्या’ यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या, सात दिवसांची पोलीस कोठडी आणि आता..

दौंड : दौंड तालुक्यातील देलवडी येथील रहिवासी आणि माणिकपूर (वसई) मुंबई येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या दीपाली कदम हिने दि. 03 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास देलवडी येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

या आत्महत्येप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात वाल्मीक अहिरे या वसई, मुंबई येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी वाल्मीक अहिरे या पोलीस कर्मचाऱ्यास यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तावरे मॅडम, पोलीस नाईक नारायण जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुपेकर यांनी दि. 10 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथून अटक केली होती. त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलीस कोठडीमध्ये यवत पोलिसांनी आरोपीची विविध बाजूंनी चौकशी करत त्याबाबतची माहिती घेऊन आरोपीला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी वाल्मीक अहिरे याची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

पोलीस खात्यात पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या वाल्मीक अहिरे याने दीपाली कदम हिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत तिचे जमलेले लग्न मोडल्याने दीपाली हिने आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे वाल्मीक अहिरे याचे वय चाळीसच्या पुढे असून त्याला दोन मोठी मुले असल्याचे समोर आले आहे. तरीही तो दीपाली हिला त्रास देऊन आपल्यासोबत लग्न कर असे म्हणत असे आणि तीला मारहाण, शिवीगाळ करत असे. या सर्व शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दीपाली हिने आपल्या भावाला मेसेज करून आपण वाल्मीक अहिरे या पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहून गळफास घेत आत्महत्या केली होती.

या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तावरे करीत आहेत.