महिला पोलीस आत्महत्या प्रकरण : पोलीस नाईक वाल्मीक अहिरे ‛फरार’

पुणे ग्रामीण : पोलीस म्हटले की जनतेसमोर समोर उभा राहतो एक ‛आधार’. मात्र हाच आधार कधी कधी जीवघेणाही ठरत असल्याचे अनेक घटनांतून समोर येत आहे.
पोलीस हा जनतेचा आधार असतो आणि अनेक प्रामाणिक पोलिसांमुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे, त्यांना मोठी मदत झाल्याचे आपण पाहत असतो मात्र काही चुकीच्या मानसिकतेच्या आणि गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांमुळे आणि त्यांच्या कारनाम्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन बदनाम होत आल्याचेही समोर येत आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात राहणाऱ्या एका महिला पोलीसासोबत असाच काहीसा प्रकार घडला असून तिच्याच खात्यात पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या वाल्मीक अहिरे याच्या शारीरिक आणि मानसिक त्रासास कंटाळून तिने आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली आहे.

या पोलिसावर यवत (ता. दौंड) पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल होताच हा पोलीसवाला गुंडा फरार झाला आहे. या पोलिसाने गुंडांना लाजवेल आणि चित्रपटात दाखवतात असे कृत्य केले असून पोलीस प्रशासनाची पुरती बदनामी केली आहे. या पोलिसाने अगोदर महिला पोलीस कर्मचाऱ्याशी ओळख वाढवली नंतर तिला मारहाण आणि मानसिक त्रास देऊ लागला. स्वतःचे लग्न झालेले असताना मुले मोठी झालेली असताना हा पोलीस त्या महिला पोलिसाशी लग्न करायची स्वप्ने पाहत होता. त्यामुळे त्याने या पोलिसाच्या भावाला धमकावून जर तिचे दुसरीकडे कुठे लग्न केले तर मी मर्डर करून टाकीन असे धमकावत होता. हे कमी होते की काय त्याने शेवटी दीपाली हिचे जमलेले लग्न मोडून तिला जगणे मुश्किल करून ठेवले होते.

दीपाली कदम ही पालघर येथे काम करत असताना तिची आरोपी पोलीस नाईक वाल्मीक अहिरे याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेऊन वाल्मीक अहिरे याने दीपाली हिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. दीपाली हा त्रास सहन करत राहिल्याने आरोपीची मजल तिचे लग्न मोडण्यापर्यंत गेली आणि शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून दिपालीने भावाला सर्व हकीकत तोंडी आणि मेसेज करून सांगत आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.