नेमकं असं काय आहे ‘कुल’ कुटुंबाकडे की दौंडच्या जनतेने त्यांना ‘आठ’ वेळा निवडून दिलं नक्की वाचा… पिता-पुत्राची ‘हॅट्रिक’ ही तर राज्यातील खूप दुर्मिळ बाब

दौंड (अब्बास शेख) : संपूर्ण राज्यामध्ये एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींची विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक होणं ही खूप दुर्मिळ बाब पहायला मिळत आहे. दौंड चे विद्यमान आमदार राहुल कुल हे २०१४, २०१९ आणि आत्ता २०२४ असे सलग तीनवेळा निवडून येत हॅट्रिक केली आहे तर आमदार राहुल कुल यांचे पिता दिवंगत स्व.आमदार सुभाष आण्णा कुल हे १९९०, १९९५ आणि १९९९ असे सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी त्या काळात हॅट्रिक केली होती. स्व.सुभाष आण्णा कुल यांच्या पत्नी आणि आमदार राहुल कुल यांच्या मातोश्री श्रीमती रंजनाताई कुल ह्या सुद्धा दोनवेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

एकाच घरातील पती, पत्नी आणि मुलगा निवडून आल्याची राज्यात दोनच उदाहरणं सापडतात ज्यामध्ये दौंड चं कुल कुटुंब आणि कन्नड (संभाजीनगर) येथील जाधव कुटुंबं ज्यामध्ये रायभान जाधव, त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव आणि मुलगा हर्षवर्धन जाधव या एकाच कुटुंबातील पती,पत्नी आणि मुलाचा समावेश होतो.

‘कुल कुटुंब’ तब्बल ‘आठ’ वेळा निवडून येण्याची महत्वाची कारणे – विधानसभा निवडणुकीला एकवेळ निवडून येण्यासाठी भल्याभल्यांचा कस लागतो मात्र येथे तर एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि पुत्र असे तब्बल आठवेळा निवडून आलेलं ‘कुल’ कुटुंब हे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. कुल कुटुंबाकडे नेमकं असं काय आहे की संपूर्ण दौंड तालुक्याची जनता त्यांना इतकं प्रेम देत आहे हे आता आपण पाहूया… सुभाष आण्णा यांच्या माध्यमातून तालुक्याला अच्छे दिन.. दौंड तालुक्यात १९९० साली अपक्ष म्हणून निवडून आलेले सुभाष आण्णा कुल हे सलग तीनवेळा आमदार झाले. एकंदरीत वातावरण पाहता ते पुढेही आमदार राहिले असते मात्र २००१ साली त्यांचं आकस्मिक निधन झालं. सुभाष आण्णा कुल हे १९९० साली ज्यावेळी पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी दौंड तालुक्यातील रस्ते, वीज आणि पाणी या महत्वाच्या मूलभूत गरजांवर त्यांनी काम केले. भविष्यात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवू शकते हा दूरदृष्टी विचार करून त्यांनी नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून त्या माध्यमातून पाणी अडवून पाणी आसपासच्या परिसरात पाणी जिरेल आणि त्याचा फायदा त्या त्या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला होईल हा दूरदृष्टी विचार अमलात आणला ज्याचा फायदा आजही ३४ वर्षानंतरही शेतकरी आणि नागरिकांना होत आहे.

सुभाष आण्णा कुल यांचा स्वभाव हा खूप मनमिळावू होता. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला मान, सन्मान देणे, आरोग्य निधीच्या बाबतीत गोरगरिबांना मदत करणे आणि त्यांच्याशी अतिशय नम्रपणे, प्रेमाने आणि स्मित हास्य करून बोलणे ही त्यांची खुबी होती. त्यांच्या या सवयीमुळे गोरगरीबाला सुद्धा आपणच आमदार आहोत असे वाटायचे. पुढील काळात त्यांनी अनेक महत्वाच्या बाबींवर काम केले. स्वतःकडे मंत्रिपद येत असताना त्यांनी मनाचा मोठेपणा करून त्यावेळी दुसऱ्यांना संधी दिली होती. आमदार असताना त्यांनी केलेली कामे ही जनतेला इतकी भावली की जनतेने त्यांना सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून दिले. आण्णांनी १९९९ ला तिसऱ्यांदा प्रचंड मतांनी निवडणूक जिंकल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत म्हणजे २००१ साली त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने दौंड तालुक्यावर शोककळा पसरली.

आण्णा गेले अण कुल कुटुंबासह तालुक्यावर दुःखाचा डोंगर असताना राजकीय घडामोडिंना वेग – आण्णा गेले अण कुल कुटुंब आणि तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या मात्र जनता भक्कमपणे कुल कुटुंबाच्या पाठीमागे उभी राहिली आणि २००१ आणि २००४ साली सुभाष आण्णा कुल यांच्या पत्नी श्रीमती रंजनाताई कुल ह्या दोनवेळा आमदार झाल्या. त्यांच्या काळातही त्यांनी जनतेची मूलभूत गरजा असलेली महत्वाची कामे केली, जनतेची सेवा करताना त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही.

तालुक्याला आरोग्यदूत मिळाला – २०१४ साली सुभाष आण्णा आणि श्रीमती रंजनाताई यांचे सुपुत्र राहुल कुल हे प्रथमच आमदार झाले. राहुल कुल यांनी आमदार होताच सुभाष आण्णा यांचा वारसा पुढे घेऊन जात अगोदर आरोग्याच्या दृष्टीने गोरगरीब जनतेची कामे करण्यास सुरुवात केली. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य आणि जनतेच्या विविध गरजांवर जे काम राहुल कुल यांनी केले त्याची पावती वेळोवेळी जनतेने त्यांना दिली.

२०१९ साली सर्व वातावरण विरोधात असतानाही विजय – २०१९ साली जेष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र असताना राहुल कुल यांच्या विरोधात त्यांनी रमेश थोरात यांना घड्याळ या चिन्हावर उमेदवारी दिली होती. त्यामुळे थोरातांच्या पाठीमागे पवार असताना, भीमा पाटस कारखाना बंद असताना आणि राहुल कुल यांनी ऐनवेळी कमळ हे चिन्ह हाती घेतले असतानाही दौंड तालुक्यातील जनतेने थोड्या का मताने होईना राहुल कुल यांना दुसऱ्यांदा निवडून दिले होते.

कोरोना काळातील राहुल कुल यांचे कार्य जनतेच्या स्मरणात राहण्याजोगे ठरले – २०१९ ची निवडणूक संपताच पुढील वर्षात संपूर्ण जगावर घोंगवणारे कोरोनाचे संकट महाराष्ट्रात आले आणि त्याने असा काही कहर केला की प्रत्येकजण हा दारा आड गेला. मात्र याही कालावधीमध्ये आमदार राहुल कुल, त्यांच्या मातोश्री रंजनाताई कुल आणि पत्नी कांचनताई कुल यांनी जनतेच्या सेवेसाठी आपली दारे उघडी ठेवली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे जिल्ह्यात अनेकजण मृत्युमुखी पडत असताना दौंड तालुक्यात मात्र आमदार राहुल कुल यांच्या विशेष नियोजनाने संपूर्ण तालुक्याला मोठा दिलासा मिळाला. विविध भागांमध्ये कोविड सेंटर, रेमडिसिवर, ऑक्सिजन, प्लाझ्मा आणि हर प्रकारची मदत आमदार राहुल कुल यांनी उपलब्ध करून देत प्रत्येक घडामोडीवर त्यांनी बारीक लक्ष दिले होते. त्यांच्या पत्नी कांचन कुल ह्यातर चौफुला येथील कोविड सेंटरवर ठाण मांडून बसत होत्या. प्रत्येक रुग्णाला त्या आपुलकीने भेटून त्यांची विचारपूस करत धीर देत होत्या. या सर्व प्रकारामुळे रुग्णांचे धैर्य वाढत होते आणि गंभीर परिस्थिती बनलेले रुग्णही बरे होऊन घरी जात होते. आमदार राहुल कुल यांनी सुरु केलेल्या या कोविड सेंटरमध्ये पाच हजारांच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले तर एकाही रुग्णाचा येथे मृत्यू झाला नाही. त्यामुळे आमदार राहूल कुल यांचे कोरोना काळातील कार्य हे खूपच उजवे ठरले आणि ते जनतेच्या कायम स्मरणातही राहिले आहे.

राहूल कुल यांच्या हॅट्रिक मागे ही कामे ठरली जमेची बाजू – कोरोना काळातील आमदार राहुल कुल यांचे हे काम आणि पुढील काळात त्यांनी आरोग्य निधीच्या माध्यमातून केलेली कामे, सुरु झालेला भीमा पाटस कारखाना, खासकवासला टनेलची मंजूर झालेली मागणी, मुळशी धरणाचे पाणी वळवण्यात येणारे यश आणि तालुक्यातील विविध रस्ते, विजेचे झालेले नियोजन हे आमदार राहुल कुल यांची जमेची बाजू ठरली. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर खालच्या दर्जाच्या केलेल्या टिकेचे उत्तर जनतेने मतदानातून दिले आणि सलग तिसऱ्यांदा राहुल कुल हे आमदार म्हणून निवडून आले. आमदार राहुल कुल यांची या व्यतिरिक्त आणखी बरीच कामे आहेत जी जनतेला भावली आहेत मात्र ती आपण नंतरच्या भागात पाहू. तर अश्या प्रकारे जनतेने कुल कुटुंबावर टाकलेला विश्वास त्यांनी कधीच गमावला नाही उलट जनतेचे आणखी प्रेम मिळवण्यास ते यशस्वी ठरले आहेत आणि त्यामुळे तब्बल ‘आठ’ वेळा दौंडची जनता ‘कुल’ कुटुंबाच्या बाजूने उभी राहून कुल कुटुंबातील आमदार निवडून देत आली आहे.