पुणे ग्रामिण : मुंबईहून भुवनेश्वरला जाणाऱ्या कोणार्क एक्सप्रेस मधील महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिला प्रवासी मीनाक्षी गायकवाड (वय 25,रा. संजीवनी अपार्टमेंट, सोलापूर) व सहप्रवासी कल्पना श्रीराम (रा. वालचंद कॉलेज, सोलापूर) यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन ते चार अज्ञात चोरट्यांविरोधात जबरीचोरीचा व भारतीय रेल्वे अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.26 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वा. दरम्यान कोणार्क एक्सप्रेस पुण्याहून दौंड स्टेशनला येत असताना दौंड रेल्वे हद्दीतील नानविज परिसरातील आऊटर ला पुढील सिग्नल नसल्याने थांबली. सदरच्या होम सिग्नल ची वायर ही चोरट्यांनी तोडलेली होती, त्यामुळे सिग्नल बंद होता. या परिसरात गाडी थांबताच गाडीवर चोरट्यांनी तुफान दगडफेक केली, दरम्यान S-1व S-4 बोगीच्या उघड्या असलेल्या खिडकीतून चोरट्यांनी महिला प्रवासी गायकवाड व श्रीराम यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. मीनाक्षी गायकवाड यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी हिसकावली असल्याचे दिसल्याने त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा भाऊ राकेश गायकवाड गाडीखाली उतरला व त्याने दोघा चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी त्याच्यावर दगडफेक करीत त्याला जखमी केले, व अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.
दोन्ही महिला प्रवाशांचे 1लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. घटनेची खबर मिळताच अप्पर पो. अधीक्षक गणेश शिंदे( लोहमार्ग पोलीस), स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंतरकर, दौंड लोहमार्ग पोलिस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली. लोहमार्ग पोलिसांनी या परिसरात गाड्या लुटणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा गार, सोनवडी, श्रीगोंदा, काष्टी येथे जाऊन रात्रभर तपास केला. लोहमार्ग, पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.