Kolhapur | कोल्हापूरात तणावपूर्ण वातावरणात संचारबंदि लागु.. इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश, 6 जणांना अटक

सुधीर गोखले

कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कालपासून शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याने कोल्हापूर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कालपासूनच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर विविध हिंदुत्ववादी संघटना जमा होऊन आज कोल्हापूर बंद ची हाक दिली होती त्याप्रमाणे आज सकाळी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या आक्षेपार्ह पोस्ट च्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले.

या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट आणि स्टेट्स व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करण्याची मागणी या संघटनांनी केली. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला पण कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलीसांकडूनही जमावर सौम्य लाठीमार करण्यात आला. लाठीमार सुरू झाल्यानंतर महापालिका चौक आणि शिवाजी चौक या ठिकाणी मोठी धावपळ झाली.

सहकारनामा न्यूज नेटवर्क च्या प्रतिनिधींनी कोल्हापूर जिल्हाप्रमुख महेंद्र पंडित यांना संपर्क केला असता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना शहरातील इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही शहरामध्ये फिरून परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये व कायदा कोणीही हातात घेऊ नये असे म्हटले आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत आक्षेपार्ह स्टेट्स आणि कोल्हापूर तणाव प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक करण्यात आली असून आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.