Kisan Tractor Rally : खुर्ची टिकविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा कायद्याला विरोध : चंद्रकांतदादा पाटील



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख) 

उद्धव ठाकरे यांनी खुर्ची टिकविण्यासाठी या कायद्याला विरोध सुरू केला असून त्यांनी या कायद्याला विरोध केल्याने त्यांना  शेतीतले काही कळते का असा प्रश्न आम्हाला पडतो. मॅडमचा रेटा आला म्हणून कायद्याला म्हणे स्थगिती दिली, मात्र केंद्राच्या कायद्याची राज्याला स्थगिती देता येत नाही असा घणाघात चंद्रकांतदादा पाटील यांनी करत दिल्लीत राहुल गांधींनी ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही शेतकऱ्याचे दैवत समजले जाणाऱ्या ट्रॅक्टरचे पूजन करण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभर शेतकरी सन्मान रॅलीचा कार्यक्रम धरला अशी माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी चौफुला ता.दौंड येथील जाहीर सभेत दिली.

पुढे बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी शेतकरी गरीब व्हावा म्हणून हे कायद्याला विरोध करतात त्यामुळे भाजप गावोगावी शिवार सभा घेणार, त्यांना कायदा समजावून सांगणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी मंत्री अनिल बोंडे यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये टाकणारे एकमेव मोदी आहेत. राज्याच्या नेत्यांनी स्वतःच्या कुटुंबात फक्त पोराला मंत्री केले. 20 लाख 93 हजार कोटीच कोरोना पॅकेज जाहीर केलं. केंद्राने सर्वसामान्य, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या. दलालाच्या पोटावर लाथ बसणार म्हणून आता हे बोंबलतायत, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मात्र कोणत्या दलालाने आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. उद्धव ठाकरे यांना आता अनेक गोष्टींचा विसर पडला आहे त्यामुळे सध्या ते गजणीचे अमीर खान झाले असल्याची टिका त्यांनी केली.

यावेळी दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांनी कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही, उलट फायदाच होणार असल्याचे सांगितले. तसेच दौंड अष्टविनायक मार्गाला 300 कोटींचा निधी लाभला, शेतकऱ्यांसाठी भांडल्याने तालुक्यात बेबी कॅनॉल सुरू झाले असे सांगून पुणे दौंड लोकल लवकर सुरू व्हावी यासाठी चंद्रकांत दादांनी पाठबळ द्यावे व लवकर लोकल सुरू व्हावी अशी मागणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस वासुदेवनाना काळे यांनी केले, या कार्यक्रमाला 160 ट्रॅक्टर रॅलीत सामील झाले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांचा सन्मान चंद्रकांतदादा यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री अनिल बोंडे, माजी.मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुलदादा कुल, गणेश भेगडे, लबाळासाहेब भेगडे, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस वासुदेवनाना काळे, दौंड भाजप अध्यक्ष माऊली ताकवणे, माऊली शेळके पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.