दौंड : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याचे वृत्त समजताच राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी लिलावती हॉस्पिटल येथे गर्दी केली होती. त्यांच्या हत्येचा विविध स्तरातून निषेध केला जात असून दौंड चे विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात या दोघांनीही या हत्येच्या घटनेचा निषेध केला आहे.
आमदार राहुल कुल यांनी या घटनेचा निषेध करताना, ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री, आमदार श्री. झिशान सिद्धीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या प्राणघातक हल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि हा आघात सहन करण्याची ताकद सिद्धीकी कुटुंबियांना देवो हीच प्रार्थना..
भावपूर्ण श्रद्धांजली.. अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आपली भावना केली आहे. तर
माजी आमदार रमेश थोरात यांनीही या घटनेचा निषेध करताना, कालची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. माझे मित्र आणि सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले, ही बातमी मनाला चटका लावणारी आहे. हा हल्ला केवळ एका माणसावर नाही, तर माणुसकीवरच आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. बाबा सिद्दीकी हे राजकारणातील एक उत्तम नेता आणि दिलदार मित्र होते. त्यांच्या स्मृती कायम आमच्या हृदयात जिवंत राहतील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या अपार दुःखातून उभे राहण्याचे सामर्थ्य प्रदान करो. अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.