खडकी – देऊळगाव राजे गट म्हणजे आरारा खतरनाक.. तीन दिग्गज एकाच गटात उभे राहणार, कोण सरस ठरणार

अब्बास शेख

दौंड तालुका : दौंड तालुक्यातील खडकी देऊळगाव राजे गटात तीन दिग्गज आपले नशीब आजमावणार असल्याने या गटात काटे की टक्कर पहायला मिळणार आहे. हा संपूर्ण गट आता दोन गट अर्धे अर्धे विभागून एकत्र करण्यात आला आहे त्यामुळे या ठिकाणी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे, आप्पासाहेब पवार आणि वासुदेव काळे यांची चांगली पकड असणारा गट बनला आहे.

आमदार राहुल कुल आणि भाजप नेते वासुदेव काळे यांचा एकच उमेदवार असेल आणि तो शक्यतो वासुदेव काळे यांची कन्या डॉ. हर्षा उर्फ हर्षदा काळे या असतील असे दिसत आहे. (यात कुल गटाचे संजय काळभोर, गणेश गायकवाड आणि अन्यही इच्छुक आहेत) तर माजी आमदार रमेश थोरात आणि विरधवल जगदाळे या दोघांची ताकत येथे एक होणार असून विरधवल जगदाळे यांची या गटात सर्वात जास्त पकड असल्याने त्यांना या गटात मात देण्यासाठी मोठे चक्रव्यूह आखावे लागणार आहे.

जगदाळे आणि काळे या दोन दिग्गजांनंतर पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार हेही तुल्यबळ उमेदवार येथे उभे राहणार असून ते मोठे आव्हान उभे करतील यात शंका नाही. एकंदरीतच खडकी देऊळगाव राजे गटात काटे की टक्कर होणार असून या विभागात दबदबा असणारे विरधवल जगदाळे यांना वरील दोन उमेदवारांपैकी कोणता उमेदवार शह देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पवार आणि थोरात गटाची मते विभागली तर यावेळी भाजपला येथे गोल्डन चान्स मिळणार का यावरही अडाखे बांधले जात आहे.