खडकवासला धरण 97 टक्के भरले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे जिल्ह्यातील शेतकरी आणि पुणे शहर वासीयांना एक आनंदाची बातमी असून त्यांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता तूर्तास मिटण्याची चिन्हे दिसत आहेत. खडवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने आता या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण सध्या 97 टक्के भरले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रशासनाकडून आवाहन – खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण ९७ टक्के भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत असून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिपर्जन्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने आज दुपारी १.०० नंतर धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात ४२८ क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. वाहने नदीपात्रात लावू नयेत. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या अगोदर आज संध्याकाळी ४.०० ते ६.०० च्या दरम्यान खडकवासला धरणातून ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार होता मात्र पावसाचा जोर वाढल्याने दुपारी १.०० वाजताच ४२८ क्यूसेक्स ने विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत राहिला तर पाण्याच्या विसर्गाचाही वेग वाढवला जाऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसेच पुणे शहरात असणाऱ्या नदीपात्रात आपली वाहने न लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.