‘कॅन्सर’ रुग्णांसाठी केडगावचे ‘निरामय हॉस्पिटल’ ठरतंय ‘वरदान’

शब्द रचना : अब्बास शेख | माहिती : विकास शेळके

दौंड : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर उपचार करणारे डॉक्टर विशाल खळदकर यांचे निरामय हॉस्पिटल हे ग्रामिण भागातील पहिले कॅन्सर हॉस्पिटल आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुला रोडवर हे निरामय हॉस्पिटल असून या ठिकाणी कॅन्सर सारख्या अति गंभीर आजार जडलेल्या रुग्णांवर कमी खर्चात योग्य पद्धतीने उपचार केले जातात. या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार घेऊन अनेकजण ठणठणीत बरे झाल्याचे स्वतः रुग्ण सांगतात. अश्या या ग्रामिण आणि शहरी भागातील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना नव संजीवनी देणाऱ्या डॉक्टर विशाल खळदकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सहकारनामा’ ने त्यांच्या कामाचा घेतलेला हा आढावा.

डॉ. विशाल खळदकर

कॅन्सर म्हटले की माणसाच्या जगायच्या आशा मावळून अंगाचा थरकाप उडतो. अश्या या कॅन्सर सारख्या आजारावर उपचार घ्यायचे म्हटले तर ते खूप खर्चिक असते. त्यामुळे ग्रामिण भागातील अनेकजण खर्च पेलवणार नाही म्हणून किरकोळ उपचार घेऊन मरणाच्या दारापर्यंत पोहचतात. मात्र आता कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरत आहे ते केडगाव येथील डॉ. विशाल खळदकर यांचे निरामय हॉस्पिटल. शहरामध्ये जाऊन उपचार करण्याची ऐपत नसलेल्या, तयारी नसलेल्या अनेक रुग्णांना येथे मोठा दिलासा मिळत आहे. कॅन्सरच्या उपचारावर येणारा खर्च आणि घरातील व्यक्तींचे होणारे हाल या हॉस्पिटलमुळे नक्कीच थांबले आहेत.

याबाबत काही रुग्णांच्या नातेवाईकांनी माहिती देताना, शहरात जाऊन कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे आणि नातेवाईकांचे मोठे हाल व्हायचे. आयुष्यभर जपलेला पैसा तर जायचाच मात्र आपल्या घरापासून दूर असलेल्या पुणे, मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये रुग्णाला अनेक महिने रहावे लागायचे. आपले गाव आणि आपला तालुका यापासून दूर रहावे लागल्याने अनेकांचे मानसिक खच्चीकरण व्हायचे. आता या सर्वांवर मात करण्यासाठी डॉ. विशाल खळदकर यांनी शहरात आपले हॉस्पिटल सुरु न करता आपल्या गावातच रुग्णांची सेवा करण्यासाठी हॉस्पिटल सुरु केले आहे आणि पैसा न पाहता रुग्णसेवेला पसंती दिली आहे.

कॅन्सर (कर्करोग) सारखा गंभीर आजार आपण या ठिकाणी बरा करू शकतो. कितीही गंभीर आजार असला तरी त्यावरती योग्य पद्धतीने उपचार केले तर रुग्ण बरा होऊ शकतो असे डॉ. विशाल खळदकर यांनी सहकारनामा शी बोलताना सांगितले. योजनांचा लाभ पेशंटला मिळावा यासाठी डॉ. खळदकर हे सरकारच्या सर्व योजना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगतात. तसेच या योजनांचा लाभ गरजू रुग्णांना कसा होईल हेही पाहतात. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी लागणारी सर्व उपकरणे येथे उपलब्ध आहेत. कॅन्सर सारख्या आजारावर येथे कमी खर्चात योग्य उपचार केले जातात ही या रुग्णालयाची जमेची बाजू आहे.

उच्चशिक्षित असलेले डॉक्टर विशाल खळदकर आणि डॉक्टर गायत्री खळदकर हे जोडपे रुग्णांना आधार देण्यासोबतच त्यांच्या नातेवाईकांना प्रेमाची वागणूक देत असल्याने डॉक्टर म्हणजे आपल्या परिवारातील एक घटक असल्याचे येथील रुग्णांचे नातेवाईक सांगतात. केवळ पैसा मिळतो म्हणून शहरात हॉस्पीटल सुरु न करता आपल्या गावाकडील लोकांची सेवा करण्यासाठी आपल्या गावातच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी हॉस्पीटल सुरु करून संपूर्ण पुणे ग्रामिणमध्ये अल्पावधित नावलौकिक मिळविणाऱ्या आणि गोरगरिबांचे आशीर्वाद घेणाऱ्या डॉ. विशाल खळदकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांना त्यांच्या परिवाराला उत्तम आरोग्य लाभावे आणि डॉ. विशाल खळदकर आणि डॉ. गायत्री खळदकर यांच्या हातून अशीच रुग्णसेवा होत रहावी हीच ‘सहकारनामा’ परिवाराकडून सदिच्छा!!!