अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक असणाऱ्या केडगावमध्ये संघटित गुन्हेगारी डोके वर काढताना दिसत आहे. रेकॉर्डवर असणारे गुन्हेगार आणि गुन्हेगारी मानसिकता असणारे अनेकजण सोबत घेऊन फिरणाऱ्या पांढरपेशी इमेजच्या मागे लपलेला संघटित गुन्हेगारीचा मास्टरमाईंड सध्या येथील लोकांना ब्लॅकमेल करुन लुटत आहे.
या टोळीने या परिसरात असलेल्या शेतजमीन, प्लॉटिंगवर लिटिगेशन करणे, लोकांना ब्लॅकमेल करणे असे धंदे राजरोसपणे सुरु केले असून यातून या टोळीने बक्कळ पैसा कमावला आहे. दादागिरी आणि दहशतीमधून अमाप पैसा कमावणे हा उद्देश या टोळीने डोळ्यासमोर ठेवत आपले संघटित गुन्हेगारीचे कार्य सुरु केल्याने पोलिसांनी वेळीच या टोळीच्या मुसक्या आवळल्या नाही तर भविष्यात या परिसरामध्ये मोठे कांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या टोळीने काही ठिकाणी ब्लॅकमेलिंग करुन पैसे मिळविल्याने या टोळीचे मनोधैर्य कमालीचे वाढले आहे. त्यामुळे एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देणे, शेतजमीन, प्लॉट बळकाविण्यासाठी त्यांना लाखो रुपयांची मागणी करणे आणि संघटितपणे टोळी तयार करुन एखाद्या प्लॉटवर जावून तेथे आपली दहशत निर्माण करु पाहणे, दादागिरी करत संघटित टोळीच्या माध्यमातून शेतजमीन, प्लॉटचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणे असले प्रकार ही टोळी करताना दिसत आहे.
या अगोदर अश्या टोळ्यांना दौंड तालुक्यात मोक्का (mcoca) लावण्याचे काम यवत आणि दौंड पोलिसांनी केले आहे. अनेक मोठमोठ्या गुन्हेगारांना पोलिसांनी वठनिवर आणल्याचा इतिहास आहे. मात्र हा इतिहास पाहता या टोळीने स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांशी मैत्री वाढवत त्यांना चहापाणासाठी आपल्या सोबत भर चौकात घेऊन जाने आणि पोलीस आम्हाला सामिल आहेत त्यामुळे आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही असा संदेश सर्वसामान्य लोकांना देण्याचा प्रयत्न ही टोळी करताना दिसत आहे. त्यामुळे अश्या लोकांच्या आग्रही चहापाणाला भुलणाऱ्या पोलिसांवरही आता संशयाची सुई फिरताना दिसत आहे.
टॉर्चर आणि दादागिरीतून आलेला अनधिकृत पैसा या टोळीने अनेक जमिनी आणि प्लॉट घेण्यात लावला असल्याचे रेकॉर्डवरून दिसत आहे त्यामुळे या टोळीची पाळेमुळे खोदून वेळीच या टोळीवर योग्य ती कारवाई करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.
जर तुम्हाला कोणी तुमची शेती, प्लॉट बळकविण्यासाठी धमकावत असेल, त्रास देत असेल. आम्हाला पैसे द्या अन्यथा तुमच्या जमीन, प्लॉटवर लिटिगेशन करु, ताबा घेऊ अशी धमकी देत असेल तर त्वरित स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे. लँड माफियाचे काळे कारनामे.. वाचा पुढील अंकात






