केडगाव उपसरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच | ‘ते’ सदस्य ‘थोरात’ गटाशी इमान राखणार.. की ‘पुन्हा’ मार्केट कमिटीची पुनरावृत्ती होणार ! गावपुढाऱ्यांना सदस्य पुत्राचा ‘करारा’ जवाब

| अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील अती महत्वाची ग्रामपंचायत म्हणून केडगाव ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये येथे केडगाव विकास आघाडीच्या पूनम गौरव बारवकर यांची सरपंचपदी जनतेतून मोठ्या मताधिक्याने निवड झाली. या निवडणुकीत कुल, केडगाव विकास आघाडी, थोरात गटाचे सदस्य संमिश्र संख्येने निवडून आले. ज्यामध्ये महेश म्हेत्रे, प्रशांत शेळके, प्रियांका मोरे, अशोक हंडाळ, दत्तात्रय शेळके, पल्लवी बारवकर, भाऊसाहेब शेलार, पुष्पावती हंडाळ, नितीन जगताप, रेखा राऊत, तेजस्विनी गायकवाड, संदीप राऊत, शैला पितळे, सारिका भोसले, कुसुम गजमल, निलेश कुंभार, लता गायकवाड
या 17 सदस्यांचा समावेश आहे.
येत्या 23 तारखेला याच सदस्यांमधून उपसरपंच निवडला जाणार असून येथील गावपातळीवरील ‘कुल’ गटाने त्यांचा उपसरपंच करण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. यासाठी कुल गटातील सर्व सदस्यांना त्यांनी अज्ञात स्थळी घेऊन गेल्याची चर्चाही केडगावमध्ये होत आहे. तर केडगाव विकास आघाडी आणि थोरात गटानेही कोणत्याही परिस्थितीमध्ये उपसरपंच आपलाच होणार हा चंग बांधला असून त्यांच्याकडूनही केडगाव विकास आघाडी आणि थोरात गटातील सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत.

गद्दारीचा शिक्का कोण मारून घेणार !
थोरात गटाच्या एका महिला सदस्यांच्या मुलाला एका गटातील गाव पुढाऱ्यांनी उपसरपंच पदाचे आमिष दाखवून तुम्ही आमच्यात या, किंवा छुप्या पद्धतीने आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला उपसरपंच करतो असे आमिष दाखवले मात्र ‘गद्दारीचा शिक्का’ माथ्यावर मारून ‘उपसरपंच होण्यापेक्षा विरोधात बसू पण उजळ माथ्याने फिरू’ असे खडे बोल सदस्य पुत्रांनी सुनावत विरोधकांच्या आशेवर पाणी फिरवल्याची जोरदार चर्चा केडगावमध्ये रंगत आहे.

कुल, केडगाव विकास आघाडी आणि थोरात गटाचे सदस्य बलाबल

‘कुल’ गटातील सदस्यांची संख्या 8 असून त्यामध्ये पुष्पावती हंडाळ, महेश म्हेत्रे, प्रियांका मोरे, अशोक हंडाळ, सारिका भोसले, भाऊसाहेब शेलार, निलेश कुंभार, लता गायकवाड यांचा समावेश आहे. तसेच ‘केडगाव विकास आघाडी’च्या सदस्यांची संख्या 5 असून त्यामध्ये संदीप उर्फ पिंटू राऊत, नितीन जगताप, रेखा राऊत, तेजस्विनी गायकवाड, शैला पितळे, यांचा समावेश आहे तर थोरात गटाचे पॅनलमधून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या 3 आणि बंडखोर उमेदवार 1 अशी आहे. ज्यामध्ये दत्तात्रय शेळके, पल्लवी बारवकर आणि कुसुम गजरमल आणि बंडखोर उमेदवार प्रशांत शेळके असे सदस्य बलाबल आहे. सरपंच पूनम बारवकर यांनाही येथे मतदान करण्याचा अधिकार असून जर उपसरपंचपदाच्या उमेदवारांना समसमान मते पडली तर संपूर्ण भिस्त ही सरपंचांवर असणार आहे.

‘ती’ निवडणूक आणि ‘ही’ निवडणूक
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर झालेल्या मार्केट कमिटी निवडणुकीत मोठे बलाबल असतानाही थोरात गटाला पराजयाचा सामना करावा लागला होता. आता मात्र त्याचा वचपा काढण्याची संधी थोरात गटाला चालून आली आहे मात्र यावेळीही थोरात यांच्यासोबत गद्दारी करून कोणी त्यांना शह देणार की थोरात यांच्या शब्दाला जागून दोन पावले मागे पुढे होऊन त्यांचा मान राखणार हे येत्या 23 तारखेला उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागते यावरून समजणार आहे.