अब्बास शेख
केडगाव (दौंड) : केडगाव ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर आता येथील प्रमुख आप्पा, दादा या दोन गटातील कार्यकर्त्यांच्या मागण्या सुद्धा जोर धरू लागल्या आहेत. यावेळी अप्पांचे काही कार्यकर्ते अप्पांनी कार्यकर्त्यांमध्ये ‘मेळ’ घालावा असे सुचवत आहेत तर दादांचे प्रमुख कार्यकर्ते केडगाव स्टेशन ‘या’ वार्डमधून ‘सरपंच’ पदाचा उमेदवार द्यावा अशी मागणी करताना दिसत आहेत.
केडगावचे सरपंच पद ‘सर्वसाधारण महिला’ राखीव
केडगाव येथील सरपंच पद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्याने सरपंच पदाला इच्छुकांची यादीही मोठी असल्याचे समोर येत आहे. ‘आप्पा’ गटातून शेळके आडनावाची दोन नावे सरपंच पदासाठी प्रामुख्याने पुढे येत असून या मध्ये संताजी (मनोज) शेळके आणि धनंजय शेळके यांच्या कुटुंबातून महिला उमेदवार देण्यासाठी सल्लामसलत सुरु आहे. त्यामुळे या मध्ये अप्पांनी लक्ष देऊन यांच्यामध्ये मेळ घालावा अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. तर ‘दादा’ गटाकडे सध्या सरपंच पदासाठी इच्छुकांची मोठी यादी असल्याचे दिसत असून यामध्ये प्रामुख्याने भोसले-होळकर, देशमुख, शेळके या नावांचा आणि या आडनावांतील विविध उमेदवारांचा यात समावेश असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे दादा गटात यातील इच्छुक उमेदवारांचा विचार केला जाणार की ऐनवेळी वेगळाच उमेदवार दिला जाणार यावर मोठी चर्चा सुरु आहे. तर केडगाव मधून सरपंच पदाच्या निवडणुकीला नंदिनी सचिन गायकवाड याही उमेदवार इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
‘दादा’ गटाकडून केडगाव स्टेशन मधून सरपंच उमेदवाराचा विचार व्हावा दादा गटाकडून आणि प्रामुख्याने दादांकडून केडगाव स्टेशन येथील उमेदवाराचा विचार करण्यात यावा अशी मागणी आणि चर्चा सध्या केडगाव स्टेशन परिसरातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येत आहेत. केडगाव स्टेशन हा सर्वात मोठा वार्ड असून येथील मतदार संख्यासर्वात जास्त आहे. येथील उमेदवार दिल्यास केडगाव स्टेशन येथील मतदार त्या उमेदवाराला जास्त पसंती देतील अशी मागणी या कार्यकर्त्यांची असल्याचे दिसत आहे.
‘अप्पांनी’ मेळ घातल्यास गटाची ताकद वाढणार आप्पा गटात सरपंच पदासाठी प्रामुख्याने दोन उमेदवारांची नावे प्रकर्षाने पुढे येत आहेत. यातील पहिले नाव वनिता संताजी (मनोज) शेळके यांचे असून दुसऱ्या इच्छुक उमेदवार अंकिता धनंजय शेळके यांचे नाव आहे. संताजी (मनोज) शेळके हे गेल्या दहा वर्षांपासून केडगाव ग्रामपंचायत चे सदस्य असून त्यांना राजकीय आणि प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव आहे तर धनंजय शेळके यांचा मित्र परिवार मोठा असून त्यांचा नागरिकांमध्ये दांडगा संपर्क आहे. त्यामुळे अप्पांनी स्वतः यात लक्ष घालून कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये मेळ घालावा अशी मागणी होत आहे.