Kedgaon | केडगाव ग्रामपंचायतच्या निविदेवरून ‘वाद उफाळला’.. सरपंचांच्या ‘त्या’ अटीवरून सदस्यांकडून आंदोलनाचा इशारा तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दौंड | दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतने ३० लाखाच्या कामाची निविदा काढली असून ज्यांना टेंडर भरायचे आहे त्यांनी स्थळपाहणी करून त्याचा फोटो जिओ टॅग करत सरपंचांचे सही आणि शिक्का असलेले पत्र घेऊन ते निविदेला जोडावे अशी अट टाकण्यात आली आहे. या अटीवर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दिलीप हंडाळ, नितीन जगताप, नितीन कुतवळ यांनी तीव्र आक्षेप घेत ग्रामसेवकांना कारवाई आणि आंदोलनाचा इशारा देणारे पत्र दिले आहे.

सदस्यांनी दिलेले तक्रारी अर्ज

ही मनमानी पद्धतीने टाकण्यात आलेली अट कायद्याला धरून नाही त्यामुळे ही रद्द करून पुन्हा कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात असे या निवेदनात म्हटले आहे.


विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनी ‘सहकारनामा’शी बोलताना माहिती दिली की, ग्रामपंचायतीने जी कामाची निविदा काढली आहे त्या निविदेमध्ये ज्यांना कामाचे टेंडर भरायचे आहे त्यांनी स्थळपाहणी करून जिओ टॅग करून त्याचा फोटो व सरपंच यांचे सही आणि शिक्का असलेले पत्र घेऊन ते निविदेला जोडावे अशी अट टाकण्यात आली आहे तीच चुकीची आहे. तसेच या अटी नुसार सरपंचांनी त्यांच्या काही जवळील लोकांना सही शिक्का असलेले पत्र दिले आहे. मात्र गावातील व परिसरातील इतर लोक ज्यांना टेंडर भरायचे आहे ते स्थळ पाहणीकरून अटिमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पत्रावर सरपंचांचा सही व शिक्का घेण्यासाठी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, फोन करत आहेत मात्र सरपंच त्यांचा फोन उचलत नाहीत असा आरोप नितिन जगताप यांनी केला आहे.

उद्याच्या ८ तारखेपर्यंत जर सरपंचांचे सही, शिक्का असलेले पत्र त्या टेंडरप्रक्रियेला जोडले नाही तर टेंडर भरता येणार नाही त्यामुळे ही ‘अट’ आणि हा ‘प्रकार’ जाणून बुजून केला जात असल्याचा आरोप यावेळी नितीन जगताप व वरील इतर सदस्यांनी केला आहे. याबाबत केडगाव चे सरपंच अजित शेलार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन कधी संपर्क क्षेत्राच्या बाहेर तर कधी स्विचऑफ असल्याचे सांगत होते.

विद्यमान तीन सदस्य व एक ठेकेदार असे चार तक्रारी अर्ज आमच्याकडे अलेलेल आहेत. या निविदांमध्ये प्रथम दर्शनी सरपंचांची स्थळ पाहणी सही, शिक्के पत्र घेण्याची टाकण्यात आलेली अट ही नियमबाह्य व चुकीची वाटत आहे. तसेच ज्यांना टेंडर घ्यायचे आहे त्यांना अजूनही ती पत्रे देण्यात आली नाहीत अशीही तक्रार येत आहे. ते उपलब्ध होत नसल्याचा जो आरोप केला गेला आहे त्या अनुषंगाने ज्यांना नियम व अटी पूर्ण करून टेंडर भरायचे आहेत त्यांना वरील स्थळ पाहणी अटितील पत्र सरपंचांकडून मिळायला हवे. मात्र तसे होताना दिसत नसल्याचे तक्रारदारांच्या तक्रारी अर्जावरून समोर येत आहे. त्यामुळे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविले आहे. तसेच या वरील प्रकारामुळे निविदा उघडण्यासाठी शासकीय अधिकारी म्हणून मी माझी डेस्क वापरण्यास विरोध करणार आहे.

काळे भाऊसाहेब, ग्रामविकास अधिकारी केडगाव ग्रामपंचायत